गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी अखेर अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असून मैदानात उतरले आहेत. उत्पल पर्रीकर पणजीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या वडिलांचाही हाच मतदारसंघ होता. १९९४ ते २०१९ पर्यंत मनोहर पर्रीकर याच मतदारसंघातून निवडणूक लढले. आपण एकटे लढत असलो तरी पणजीमधील लोक आपल्याला समर्थन देतील असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला आहे. मला काही विशेष गोष्टींविरोधात लढायचं असल्याचं उत्पल पर्रीकर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितलं आहे.
उत्पल पर्रीकर यांना निवडणुकीत पराभव झाल्यास काय असं विचारलं असता त्यांना आपण याकडे करिअर म्हणून पाहत नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “जर असंच असतं तर मी कोणताही मतदारसंघ निवडून निवडणूक लढली असती. पण मी त्यासाठी लढत नाही आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची कमान लोकांच्या हातात आहे, त्यांनाच निर्णय घेऊ देत”.
काही नेते आणि त्यांच्या पत्नींना भाजपाकडून तिकीट दिलं जात असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “मनोहर पर्रीकरांच्या भाजपात हे शक्य होतं का? काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. या गोष्टी सीमा ओलांडणाऱ्या आहेत. पणजीमध्ये पक्ष निर्माण करणारे माझ्यासोबत असताना दुर्दैवाने मला एकट्याने लढण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे”.
यावेळी उत्पल पर्रीकर यांनी हा लढा सहज नसेल असं मान्य केलं आहे. “माझ्यासोबत असणाऱ्या उमेदवारासोबत यंत्रणा आहे. माझ्या समर्थकांच्या साथीने मी एकटा लढत आहे. पणजीमधील लोक मला समर्थन देतील असा विश्वास आहे,” असं उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत.
मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वात भाजपाने गोव्यात सुरुवात केली होती. १९९० मध्ये छोटा पक्ष असणाऱ्या भाजपाने २०१२ विधानसभा निवडणुकीत सर्वात प्रथम बहुमत मिळवलं होतं.
मनोहर पर्रीकर यांनी पक्षांतर करणाऱ्यांना पक्षात आणले असताना भाजपाला का दोष देत आहात असं विचारलं असता उत्पल पर्रीकर म्हणाले, “माझे वडील असेपर्यंत मध्ये निवडणूकोत्तर युती होती. पम आता बाबूश एकप्रकारे त्यांची मूल्ये ताब्यात घेत आहेत असं मला वाटत आहे, अन्यथा या गोष्टी घडल्या नसत्या. मी पणजीच्या रक्षणासाठी लढत आहे”.
जर वडील जिवंत असते तर या निर्णयाने आनंद झाला का असता का? अशी विचारणा केली असता उत्तर देताना ते म्हणाले की, “जर असे निर्णय घेतले असते तर ते इथेच बसले असते. तुम्ही पती आणि पत्नींना तिकीट देऊ शकता आणि नंतर मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकीट देऊ शकत नाही सांगता”.
आपल्याला राजकारणात पैशांची ताकद नको असून मत देणाऱ्या लोकांना पाठिंबा देऊ असं सांगितलं आहे. “मी तेच करत आहे ते मला पक्षाचे कार्यकर्ते आणि पणजीमधील लोक सांगत आहेत. मी पैशांचं राजकारण करण्यासाठी येथे आलेलो नाही. माझ्याकडे पणजीसाठी व्हिजन असून मतं मिळतील असा विश्वास आहे,” असं उत्पल पर्रीकरांनी सांगितलं आहे.