गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्याला हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“तुम्ही संजय राऊत यांचे चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदार संघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा,” असे आवाहन चंद्रकांत पाटील म्हणाले. “आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपाने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पणजीतून माजी मंत्री अटानासिओ ‘बाबुश’ मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याची भाजपाची योजना असल्याच्या संकेतांमुळे उत्पल पर्रीकर नाराज झाले आहेत. मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे या जागेवरुन निवडणूक लढवली होती. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. “उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तर आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीसह सर्व गैर-भाजपा पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा आणि उमेदवारी देऊ नये असा माझा प्रस्ताव आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये. मनोहर पर्रिकरांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल!,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचे तिकीट देताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी भाजपाचा प्रामाणिकपणा आणि चारित्र्यावर विश्वास आहे का, असा सवाल केला होता. त्यानंतर केवळ राजकारण्याचा मुलगा असल्याने पक्ष कोणालाही तिकीट देऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.