पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांच्या भाषणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं. यानंतर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला उधाण आलं. यावर सध्या गोव्यात असलेले भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फडणवीसांना भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून प्रखरतेने काम करेन, असं सांगितलं. तसेच कुठलंही नवीन समीकरण नसल्याचं स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुठलंही नवीन समीकरण नाही. भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून प्रखरतेने काम करेन. आम्ही पूर्ण शक्तीने आमच्या बहुमतासह महाराष्ट्रात सरकार स्थापन करू.”
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे भाजपा प्रभारी असलेले फडणवीस सध्या गोव्यात ठाण मांडून आहेत. यावेळी त्यांनी गोवा काँग्रेससह त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांवरही सडकून टीका केली. तसेच गोव्यात निकालानंतर आमदारांच्या पक्षांतरावर नियंत्रणासाठी दिल्या जाणाऱ्या शपथांवरही भाष्य केलं.
“काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वासच नाही”
फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वासच नाही. भाजपाला कुणालाही शपथ देण्याची आवश्यकता नाही, कोणतंही प्रतिज्ञापत्र सादर करण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष कमजोर झालाय. केंद्रापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. तो कमकुवत पक्ष आहे.”
“पक्षात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे हे काँग्रेसला माहिती”
“जिथं पक्षाचे नेते मजबुत असतात तिथं पक्ष मजबुत असतो. तिथं अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची गरज पडत नाही. त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे,” असं फडणवीसांनी नमूद केलं. हिजाबवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोर्ट आज त्यावर काही निर्णय द्यायला निघालं आहे. आज यासंदर्भात बोलणं योग्य होणार नाही.”
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, “लता दीदी इतक्या मोठ्या होत्या की त्यांच्या स्मारकाचा कुठलाही वाद होऊ नये. सर्वांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक तयार केलं पाहिजे. राज्यातलं सरकार लता दीदींचं स्मारक करणार असेल तर काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देणार आहे का? कारण एकही काँग्रेस नेता लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी दिसला नाही. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे आम्हाला समजलं पाहिजे.”