पणजी : सर्वासाठी घरे, खाणकाम पुन्हा सुरू करणे तसेच गोव्याची अर्थव्यवस्था पुढील दहा वर्षांत ५० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा संकल्प भाजपने जाहीरनाम्यात केला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी करकपातीचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. गोव्यातील पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. दारिद्र्यनिर्मूलनाचे आश्वासन पक्षाने दिले आहे. सामाजिक योजनांचा लाभ थेट गरिबांना मिळावा यासाठी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. वृद्धांना दीनदयाळ स्वास्थ्य योजनेंतर्गत मिळणाऱ्या निवृत्तिवेतनात तीन हजारांपर्यंत वाढ करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.