शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकासआघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. तसेच काही गोष्टी अॅडजस्ट करायला लागतात असं सूचक वक्तव्य केलं. संपर्क करायला उशीर झाला हे काँग्रेस नेते दिगंबर कामत यांचं बरोबर असल्याचं मान्य करत त्यांनी आघाडीत काही गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागतात असं म्हटलं. तसेच गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याचंही स्पष्ट करत टीएमसीचेही नेते भेटणार असल्याचा सूचक इशारा दिला.
संजय राऊत म्हणाले, “दिगंबर कामत हे गोव्यातील मोठे नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. संपर्क करण्यास उशीर झाला. कारण माझी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू होती. संपर्क करायला उशीर झाला असला तरी आघाडीत काही गोष्टी आपण अॅडजस्ट करायच्या असतात. त्यालाच आघाडी आणि गठबंधन म्हणतात. त्याला युती म्हणतात.”
“प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे की आम्ही स्वतंत्रपणे लढू. २१ जानेवारीला गोव्यात अर्ज भरण्याची सुरुवात होते आहे. मी आणि प्रफुल्ल पटेल १८-१९ तारखेपर्यंत एकत्र बसून यावर निर्णय घेऊ. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात एकत्र आहे. दिगंबर कामत यांची समजूत कशासाठी काढायची? ते समजदार आहेत. ज्या नेत्याने गोव्यासारख्या राज्यात प्रदिर्घकाळ राजकारण केलंय, मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना काय समजवायचं.”
मला उद्या तृणमूल काँग्रेसचे काही नेते भेटत आहेत, असंही संजय राऊत यांनी नमूद करत काँग्रेस नाही तर टीएमसी असा अप्रत्यक्ष इशारा दिलाय.