गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. यंदा पारंपारिक पक्ष असलेल्या काँग्रेस, भाजपासोबतच आप आणि तृणमूल काँग्रेसही निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होईल असंच दिसतंय. त्यातच भाजपा गोव्यात ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीला सामोरं जातेय. अशात पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी वडिलांच्या पणजी मतदारसंघातून दावेदारी करण्यास सुरुवात केलीय. त्यावर भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांची मुलं आहेत म्हणून भाजपात तिकिट मिळत नाही, असं म्हटलं. यावर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
माजी संरक्षण मंत्री आणि तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भुषवणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून गोवा भाजपात खल सुरू असल्याचं समोर येतंय. मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी गोव्याची राजधानी पणजीच्या मतदारसंघावर दावा केलाय. मात्र, भाजपातूनच या मतदारसंघावर इतर नेत्यांनीही दावा केल्यानं तिकिट वाटपाचा पेच निर्माण झालाय. मनोहर पर्रिकर १९९५ पासून ५ वेळा या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यामुळे आता भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघावरून वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालेलं पाहायला मिळतंय.
गोवा प्रभारी फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तिकिट वाटपाच्या या पेचावर बोलताना भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस बुधवारी (१२ जानेवारी) म्हणाले, “मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात भाजपासाठी खूप मोठं काम केलं आहे. मात्र, भाजपा उमेदवारांना ते नेत्यांची मुलं आहेत म्हणून निवडणुकीचं तिकिट देत नाही. जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांचा तिकिटासाठी विचार केला जाईल. यावर मी निर्णय घेत नाही. केवळ पक्षाचं संसदीय मंडळच तिकिट वाटपाच्या या विषयावर निर्णय घेईल.”
हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; गोवा सरकारचा मोठा निर्णय!
“जर मला केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकिट हवं असतं तर…”, उत्पल पर्रिकरांची प्रतिक्रिया
फडणवीसांच्या या प्रतिक्रियेनंतर उत्पल पर्रिकर यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना आपलं मत नोंदवलं. उत्पल पर्रिकर म्हणाले, “मला ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलायचं नाही. जर मला केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकिट हवं असतं तर मी हा आग्रह २०१९ मध्येच केला असता. तेव्हा मला मागच्या दाराने नकार देण्यात आला होता. १९९४ पासून अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांसोबत कष्ट केले. आता तुम्ही ग्राऊंडवर पाहिलं तर हे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत कष्ट करत आहेत.”