पणजी : विधानसभा निवडणूक जाहीर होताच गोव्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत़ विज्ञान- तंत्रज्ञानमंत्री, भाजप आमदार मायकेल लोबो आणि आमदार प्रवीण झान्टे यांनी सोमवारी भाजपचा राजीनामा दिला़
लोबो यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला़ मंत्रिपदाबरोबरच आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याचे लोबो यांनी स्पष्ट केल़े ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आह़े लोबो कळंगुटचे आमदार होते. लोबो यांच्या पाठोपाठ मये विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण झान्टे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़ ते ‘मगोप’मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आह़े
राज्यातील जनता भाजपच्या कारभारावर समाधानी नाही, असा दावा लोबो यांनी केला. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी टीका त्यांनी केली. तर बेरोजगारीसारख्या अनेक मुद्दय़ांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका प्रवीण झान्टे यांनी केली़ दरम्यान, या राजीनामासत्रामुळे निवडणुकीत भाजपला काहीच फरक पडणार नसल्याचा दावा पक्षाने केला़ काही जणांनी राजीनामा दिला असला तरी गोव्यातील जनता पुन्हा भाजपला सत्तेची संधी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला़