हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले होते. दरम्यान यावर आता वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये राहून खऱ्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल वाद चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी आज सकाळी पणजी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी गोव्याती स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या समस्या अशा विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये अनेकांच्या याचिका तयार केल्या होत्या. पण स्वत: याचिका केली नव्हती. त्यांना जेव्हा आग्रह झाला आणि सांगण्यात आलं त्यावेळी त्यांनी दया याचिका केली. हा इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वात जास्त काळ आणि सर्वात अडचणीच्या काळात सेल्युलर जेलमध्ये राहिलेले आहेत. खरी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या लोकांनी भोगली. त्यापैकी सावरकर एक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे आहेत.”

 गांधी-सावरकरांच्या वंशजांमध्ये खडाजंगी

“मी राजनाथ सिंह यांचा फार ऋणी आहे कारण आम्ही जे कित्येक वर्षापासून सांगत होतो की सावरकरांना माफी मागायची सवय होती त्याची पुष्टी त्यांनी केली. म्हणून मी त्यांचा आभारी आहे की शेवटी त्यांना सत्य मानावे लागले आणि त्यांनी महात्मा गांधीचे समर्थन केले यासाठीही ऋणी आहे. जेव्हा सावरकरांनी प्रथम माफीनामा दिला तेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह करत होते. त्यांचे लक्ष भारतावर नव्हते. पण त्यावेळीही सावरकरांवर त्यांचा पगडा होता हे सांगण्यासाठीही मी राजनाथ सिंह यांचे आभार मानतो. असे नविन इतिहासकार आपल्या समोर येत आहेत त्यांचे स्वागत आहे,” असे महात्मा गांधी यांचे वंशज तुषार गांधी यांनी साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले आहे.

राजनाथ यांच्या वक्तव्यानंतर गांधी-सावरकरांच्या वंशजांमध्ये खडाजंगी; म्हणाले, “सावरकरांचे उदात्तीकरण करताना पण…”

सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते

यावेळी सावरकारांचे वंशज रणजीत सावरकर यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राजनाथ सिंह यांनी माफीनामा हा शब्द न वापरता अर्ज हा शब्द वापरला आहे. ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमधील सर्व अर्ज पुस्तकांमधून समोर आणण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनी सुद्धा मान्य केले आहे की अर्ज आहेत. गांधीचा सल्ला घेणे त्यांना अशक्य होते पण गांधींनी सावरकरांची सुटका व्हावी यासाठी दोन लेख लिहिले आहेत. त्यामध्ये त्यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आणि ते हिंसेच्या मार्गाने जात आहेत यावरुन भांडण होते. जर ते शांततेच्या मार्गाने जात असतील तर मी स्वागत करतो आणि सावरकर बंधूंची सुटका व्हायला पाहिजे, देशासाठी त्यांनी प्रचंड त्याग केला आहे. देशाची जी सेवा केली आहे त्याची शिक्षा ते अंदमानात भोगत आहे असे लेखात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते आणि सावकरांच्या अर्जांना गांधीचा पाठिंबा होता,” असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.

Story img Loader