केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून अपयशी ठरल्यामुळेच मनोहर पर्रिकर यांना गोव्यात परत पाठवले जात आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर हल्ला चढवला. ते मंगळवारी गोव्यातील सालेगाव येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी उद्धव यांनी गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. भाजपने गेल्या पाच वर्षात गोव्यात काय केले, असा सवालही उद्धव यांनी विचारला. भाजपने गोव्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. यापूर्वी गोव्यातील लोकांसमोर कोणताही पर्याय नव्हता. मात्र, यावेळी सुभाष वेलिंगकर, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीचा पर्याय गोवेकरांसमोर आहे. गोव्याची जनता आम्हाला नक्कीच जिंकवून देईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. आम्ही सत्तेसाठी लोभी नाही. सुभाष वेलिंगकर यांचे बंड मुख्यमंत्रिपद किंवा सत्तेसाठी नाही, असेही उद्धव यांनी सांगितले. यावेळी उद्धव यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावरही निशाणा साधला. मनोहर पर्रिकर हे चांगले किंवा वाईट मुख्यमंत्री आहेत किंवा नाहीत, याची मला कल्पना नाही. मात्र, गोव्यातील जनतेने देशाच्या रक्षणासाठी त्यांचा माणूस पाठवला होता. मात्र, आता भाजपकडून मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, देशाच्या रक्षणासाठी त्यांची गरज असेल तर भाजपकडून असा निर्णय का घेण्यात आला, याचे उत्तर त्यांनी द्यावे. या सगळ्याचा अर्थ एकच निघतो तो म्हणजे, केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांची पुन्हा स्वगृही पाठवणी होत असल्याची टीका उद्धव यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा