गोव्यात सर्वाधिक जागांवर विजय मिळवूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. गोव्यात जनशक्तीऐवजी पैशाचा विजय झाला असून सत्ता स्थापन करण्यात आम्ही अपयशी ठरल्याने मी गोव्यातील जनतेची माफी मागतो असे दिग्विजय सिंह यांनी म्हणालेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी ४० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपने १३ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी २१ जागांची आवश्यकता असताना ९ सदस्यांचा पाठिंबा मिळविणे, हे भाजपसमोर मोठे आव्हान होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यशस्वीरित्या मोर्चेबांधणी करत बहुमतासाठी आवश्यक असलेले गणित जुळवले. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची साथ घेऊन गोव्यात भाजपची सत्ता येणार असून मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

गोव्यातील या घडामोडींवर दिग्विजय सिंह यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. दिग्विजय सिंह यांच्याकडे गोव्याची धूरा सोपवण्यात आली होती. दिग्विजय सिंह म्हणाले, सर्वात मोठा पक्ष ठरुनही आम्ही गोव्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरलो यासाठी मी गोव्यातील जनतेची माफी मागतो. पण गोव्यात यावेळी जनशक्ती नव्हे तर पैशांचा विजय झाला असे ते म्हणालेत. सत्ता स्थापन करण्यात अपयश आले असले तरी जातीयवादी संघटनांविरोधातील लढा सुरूच राहील असेही त्यांनी म्हटले आहे.  त्यापूर्वी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, गोव्यात लोकशाहीची हत्या झाली आणि यात पर्रिकर हे यातील खलनायक आहेत. गोव्यात भाजपने पाठिंबा मिळवण्यासाठी मंत्रीपद, महामंडळ आणि एसयूव्ही गाड्या देण्याचे आमिष दिले आहे असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader