गोवा विधानसभेत तातडीने विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तुमच्याकडे बहुमत होते तर सत्तास्थापनेसाठी दावा का केला नाही असा सवालही सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. सुप्रीम कोर्टाने मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधी सोहळ्यास स्थगिती देण्यास नकार दिल्याने संध्याकाळी होणा-या शपथविधी सोहळ्यातील अडथळा दूर झाला आहे. आता भाजपने दोन दिवसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी सोहळ्याचा घाट घालावा की नाही हे ठरवावे असे काँग्रेसने म्हटले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. ४० जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस १७ तर भाजपने १३ जागांवर विजय मिळवला होता. मात्र काँग्रेसमध्ये नेता निवडीवरुन वाद सुरु असतानाच भाजपने वेगाने चक्र फिरवून सत्तेस्थापनेसाठी मोर्चेबांधणी केली.
गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतकवादी पक्ष या छोट्या पक्षांच्या साथीने भाजप सत्तास्थापन करणार आहे. मात्र भाजपच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सर्वाधिक जागा काँग्रेसने मिळवूनही पर्रिकर यांना सत्तासंधी कशी दिली अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. गोव्यातील विधीमंडळ पक्षाचे नेते चंद्रकांत कवळेकर यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी व्हावी यासाठी विशेष पीठ स्थापन करण्यात आले पर्रिकर यांच्या शपथविधी सोहळ्यास स्थगिती द्यावी, तसेच पर्रिकर यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्याचा राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसलाच सत्तास्थापनेची पहिली संधी मिळायला हवी. त्याऐवजी भाजपला ती संधी देणे घटनाबाह्य आहे असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. भाजपने सत्तास्थापन करताना कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. भाजपने घोडेबाजार केल्याचा दावाही काँग्रेसने कोर्टात केला. मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधी सोहळ्याला स्थगिती द्यावी अशी मागणीही कोर्टात करण्यात आली. मात्र कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. १६ मार्चरोजी गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून बहुमत सिद्ध करताना पर्रिकर आणि काँग्रेसचा कस लागणार आहे हे नक्की.

LIVE UPDATES

१२:१७: गोवा विधानसभेत १६ मार्चला विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करावे- सुप्रीम कोर्ट

११:५३: गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

११:४७: बहुमत होते तर सत्तास्थापनेचा दावा का केला नाही – सुप्रीम कोर्टाचा काँग्रेसला सवाल

११:२३: तुमचे समर्थक आमदार कुठे आहेत, आमदारांची यादी तुम्ही सादर केली होती का – सुप्रीम कोर्टाचा काँग्रेसला सवाल

११:१२: सुप्रीम कोर्टात काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी सुरू

११:०८: राज्यपालांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे: दिग्विजय सिंह

११:०७: सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला पहिले सत्तास्थापनेची संधी दिली पाहिजे: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

Story img Loader