आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत द्या. गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. विरोधकांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी, असे आव्हानदेखील यावेळी पंतप्रधान मोदींनी केले. ‘काही पक्ष फेब्रुवारीच्या तोंडावर वचननामा तयार करत आहेत. आम्ही वचननामा जाहीर करण्याची वाट काही पक्षांकडून पाहिली जाते आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली.
‘काही पक्ष आधीच ही निवडणूक हरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आतापासूनच पराभवाची कारणे दिली जात आहेत. निवडणुकीआधी अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे कारण पुढे केले जात आहे. अशी क्षुल्लक कारणे देण्यापेक्षा विरोधकांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी,’ असे पंतप्रधान मोदींनी भाषणात म्हटले. ‘विरोधक सध्या प्रचंड कामात आहेत. अर्थ मंत्रालय जितके अर्थसंकल्प तयार करण्यात व्यस्त आहे, त्याहीपेक्षा जास्त व्यस्त विरोधक आहेत,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांची खिल्ली उडवली.
‘अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्यावरुन काही पक्षांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे. या पक्षांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. आता त्यांच्याकडून पराभवाची कारणे सांगितली जात आहेत. या पक्षांना अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत, याची कल्पना नसूनही हे पक्ष रडगाणे गात आहेत,’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर तोफ डागली.