आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक प्रभारीपदी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही नियुक्ती केली. गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढीलवर्षी होणार आहेत.
शनिवारी गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात अमित शहा यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजप २७ जागी निवडून येईल असा आशावाद व्यक्त केला होता. नितीन गडकरी यांनी यापूर्वी दिल्ली निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून काम केले होते. यापूर्वीही गडकरी यांनी गोवा राज्यातील निवडणुकीची जबाबदारी सांभाळली आहे.
आगामी वर्षभरात विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपाणी तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आनंदीबेन पटेल यांना पायउतार व्हावे लागले होते.
दरम्यान, बुधवारी झारखंडच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी खासदार लक्ष्मण गिलुआ यांची नियुक्ती करण्यात आली. वादग्रस्त ताला मरांडी यांनी राजीनामा दिल्यामुळे गिलुआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा