मी जातीपातीचं राजकारण मानत नाही, ‘जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ असं मी माझ्या मतदारसंघातीन जनतेला सांगितलं आहे, असं विधान भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गोव्यात पक्षाच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
“महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा – गडकरींची रेल्वे मंत्र्यांना विनंती अन् वैदर्भीयांची पंढरी वारी झाली….
“माझ्या मतदारसंघात २२ लाख मतदार आहेत. त्यापैकी ४० टक्के मुस्लीम आणि दलित आहेत. मी लोकांना सांगितलं मी जातपात मानत नाही. तुम्हीही मानू नका, जो करेगा जात की बात उसको मारुंगा कस के लाथ, असं मी माझ्या मतदारसंघातील लोकांना सांगितले आहे”, असेही गडकरी यांनी सांगितले.
“यंदा माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला जवळपास १० हजार मुस्लीम लोक उपस्थित होती. यंदाच्या निवडणुकीत मला कमी मतं मिळाली पण काही मुस्लिमांनी मला सांगितले, की आमची इच्छा आहे, पण काही कारणास्तव आम्ही तुम्हाला मत देणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की मत द्या अथवा नका देऊ. मी तुमची काम नक्कीच करेन”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा – पुण्यात लाँच झाली सीएनजी बाईक, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन! काय आहे खासियत? किती आहे किंमत?
पुढे बोलताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काँग्रेसप्रमाणे न वागण्याचा सल्ला दिला. “लालकृष्ण आडवाणी नेहमी म्हणायचे की भाजपा हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. आपलं वेगळेपण कशात आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपलं वेगळेपण पण लक्षात ठेवलं, तर नक्कीच आपण पार्टी विथ डिफ्रन्स राहू. जे काम नाही करायला पाहिजे, ते काम ज्यांनी केलं आणि त्या नाराजीतून लोकांनी आपल्याला निवडून दिलं. तेच काम आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात आणि आपल्या येण्यात कोणताही फरक राहणार नाही”, अशी प्रतिक्रियाही नितीन गडकरी यांनी दिली. तसेच पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना सत्तेचा वापर हा जनतेच्या भल्यासाठी केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.