इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांना मशिदीत घेऊन गेल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आल्याची घटना गोव्यात घडली आहे. विद्यार्थ्यांना मशिदीत नेल्यानंतर त्यांना धार्मिक विधि करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दक्षिण गोव्यातील अल्टो-दाबोलिम येथील केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयातील या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शनिवारी एका शिबिरासाठी इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांच्या एका गटाला मशिदीत नेले आणि त्यांना धार्मिक विधी करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसंच, सोमवारी, विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध “देशविरोधी कारवायांचे समर्थन” केल्याबद्दल वास्को येथे पोलिस तक्रार दाखल केली. ही कार्यशाळा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंटशी संलग्न संघटनेच्या निमंत्रणावरून आयोजित करण्यात आली होती, असा दावाही विहिंपने केला आहे.
हेही वाचा >> रस्त्याच्या कडेला आढळला डान्स बारमधील तरुणीचा मृतदेह, तपासानंतर समोर आलं धक्कादायक कारण
शाळेचे मुख्याध्यापक शंकर गावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) च्या निमंत्रणावरून, जातीय सलोखा वाढवण्यासाठी दाबोलीम येथील मशिदीला भेट देण्यात आली. बायना येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात आले होते. आमच्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांना मशिदीत नेण्यात आले. विद्यार्थ्यांना नमाज कुठे चालते आणि मशिदीत प्रवेश-निर्गमन क्षेत्र दाखविण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी आदराने आपले डोके झाकले असावे. पण, विद्यार्थ्यांना हिजाब घालण्याची किंवा धार्मिक विधी करण्यास भाग पाडण्यात आले हा दावा खोटा आहे.”
“पूर्वीही आम्ही विद्यार्थ्यांच्या मंदिर, चर्च आणि मशिदींना भेटी दिल्या आहेत. सर्व धर्मातील मुले शाळेत शिकतात. दुसऱ्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनीही मशिदीला भेट दिली होती. मला का निलंबित करण्यात आले हे मला माहीत नाही,” असंही गावकर म्हणाले.
स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ)ने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या संस्थेचे राज्य अध्यक्ष आसिफ हुसैन म्हणाले की, “मस्जिद-ए-नूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सांप्रदायिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समुदायांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आमच्या नियमित उपक्रमांचा एक भाग म्हणून दाबोलीममध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथे बऱ्याचदा विद्यार्थी स्वतःच्या मर्जीने येतात. शालेय विद्यार्थ्यांना नमाजपठणाचा परिसर दाखवून त्यांना मिठाई देण्यात आली. धर्मांतराचे सर्व दावे निराधार आहेत.”
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव संजू कोरगावकर म्हणाले की, “कार्यशाळा लहान मुलांचे ब्रेनवॉश आणि धार्मिक धर्मांतर करण्याचा प्रयत्नाच्या कटाचा एक भाग आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती दिली नाही किंवा कार्यशाळेसाठी त्यांची परवानगी घेतली नाही. आम्हाला माहिती मिळाली आहे की किमान दोन विद्यार्थ्यांनी जाण्यास नकार दिला होता, परंतु त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले. मशिदीत धार्मिक विधी करताना आणि हिजाब घातलेल्या शाळकरी मुलांचे काही फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे.”