गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवेसेना नेते आणि कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: मैदानात उतरतील. अशी माहिती आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात आयोजित पत्रकारपरिषदेत दिली. तसेच, यावेळी शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी देखील त्यांनी जाहीर केली.
“महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. युवासेनेचे प्रमुख लोक इथे प्रचाराला येतील, मतदारसंघात ते काम करतील. तर, काही मतदार संघात शिवसेनेचे युवा नेते कॅबिनेटमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय, शिवसेनेला अनेक मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय.” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
पत्रकारपरिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा आता काय नवीन पक्ष नाही. आपण मागील काही वर्षांपासून पाहत आहात, जरी निवडणुकीत आम्हाला यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणुका आम्ही २०१७ साली देखील लढवल्या होत्या, यावेळी गोव्याचं राजकारण आणि गोव्याच्या निवडणुका एकंदरीत वातावरण, हे काय फार आशादायी दिसत नाही सगळ्यांसाठीच, गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालय, अनेक राजकीय पक्ष नव्याने उतरलेले आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत, नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढतय? हे देखील स्पष्ट होत नाही.”
तसेच, “राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या पत्रकारपरिषदेत मी सांगितलं, की हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलीत आहे. पण गोव्याच्या बातीत म्हणायचं तर आलेमाव गेलेमाव हा एक नवीन राजकारणातील वाकप्रचार दिसतोय.. कारण, कोण कधी आले आणि कोण कधी गेले, कधी कोण बंड करेन याचा आता भरवसा नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढते आहे. गोव्याचं राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून पाच ते दहा प्रस्थापित लोकाच्या मुठीत आहे. मग हे भूमाफिया, धनदांडगे, राजकीय घराणी आहेत आणि त्यांच्यात सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतही राजकीय स्थान राहिलेलं नाही. इतक्या भ्रष्ट पद्धतीने गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जातय. त्यामुळे आम्ही असं ठरवलं, की या प्रस्थापितांना जर घरी बसावयचं असेल, ही आलेमाव गेलेमाव संस्कृती जर मोडून काढायची असेल, तर जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी गोव्यात द्यायची. जे आम्ही महाराष्ट्रत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी सतत सामान्य माणसाला राजकारणात आणून ताकद दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक नवीन प्रवाह गोव्यात सुरू करावा. म्हणून त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे.” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, “शिवसेना साधारण १० ते १२ जागा लढेल. आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. उरलेल्या तीन मतदारसंघाची उद्या आम्ही घोषणा करू. आम्ही ठरवलय की या वेळी प्रत्येक मतदारसंघात अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढवेल. गोव्याच्या राजकारणातील सध्याची जळमटं जर दूर करायची असतील आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून जर संपवायची असेल, तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणे गरेजेचे आहे. गोव्याच्या जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, भ्रष्टाचार, स्थानिक राजकारण्यांची दंडेलशाही, हे सगळं जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोव्याची जनता यंदा शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे.”