गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. गोव्यातील पोरीम मतदारसंघातून भाजपाने प्रतापसिंह राणे यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी दिली आहे. सुनेच्या नावाची घोषणा होताच प्रतापसिंह राणे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतापसिंह राणे आता पोरीम मतदरासंघातून निवडणूक लढवणार नाहीत. ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे हे पोरीममधून ११ वेळा आमदार आहेत आणि एकही निवडणूक हरलेले नाहीत.
आपल्या तगड्या उमेदवाराने मैदान सोडण्याच्या निर्णयाने काँग्रेसलाही धक्का बसला आहे. पोरीमच्या जागेवर प्रतापसिंह राणे यांचा विजय निश्चित मानला जात असताना भाजपाने मोठी खेळी करत काँग्रेसला धक्का दिला आहे. दिव्या राणे यांचे पती आणि प्रतापसिंह यांचा मुलगा विश्वजित राणे हे भाजपा सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. विश्वजित राणे हे वाळपोईतून निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजपाने विश्वजित राणे यांच्या पत्नीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दिव्या राणे या पहिलीच निवडणूक लढवत आहेत.
सून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढत्या वयामुळे, कुटुंबाचा कोणताही दबाव नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रतापसिंह राणे यांनी म्हटले आहे. राणे या मतदारसंघातून ११ वेळा आमदार झाले असून ते कधीही पराभूत झाले नाहीत. त्यामुळेच आपल्या ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारे हात वर केल्याने काँग्रेस नाराज आहे.
माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; गोवा सरकारचा मोठा निर्णय!
दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी नुकतीच गोवा विधानसभेत आमदार म्हणून कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण केली होती. ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची आणि कामगरीची परतफेड म्हणून गोवा कॅबिनेटनं त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला. यासंदर्भात गोव्याच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला आल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले होते.
“राजकारणातून निवृत्त व्हा नाहीतर…”; भाजपाच्या नावे मुलाने धमकावल्यानंतर वडिलांना काँग्रेसकडून तिकीट
याआधी, राजकारणातून निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात लढेन असा इशारा विश्वजित राणे यांनी प्रतापसिंह राणे यांना दिला होता. काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विश्वजित राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. वडिलांनी राजकारणातून सभ्यपणे निवृत्ती घेणे चांगले होईल, असेही विश्वजित राणे म्हणाले होते.