गोवा विधानसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे, सर्वच राजकीय पक्ष आता जवळपास सज्ज झाले आहे. शिवाय, उमेदवारांची निश्चिती देखील अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळाले नसल्यावरून उत्पल पर्रिकर यांनी हे विधान केल्याचं समोर आलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष केवळ कोणी राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट देऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी बुधवारी म्हटले होते.
उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उत्पल म्हणाले आहेत की, “मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने जे म्हटले आहे त्यावर टिप्पणी नाही करू शकत. मात्र मी मनोहर पर्रिकर यांचा मुलगा आहे म्हणून मला जर तिकीट मागायचं असतं, तर पर्रिकरांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीतच तिकीटाची मागणी केली असती.”
तर, “मी पक्षाला आधीच सांगितले आहे की मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे आणि मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल,” असे उत्पल पर्रिकर यांनी या अगोदरच बोलून दाखवलेले आहे. दरम्यान, सध्या या जागेचे प्रतिनिधित्व करणारे अतानासियो मोन्सेराते इतर नऊ आमदारांसह भाजपामध्ये सामील झाले आहेत. ज्यांनी २०१७ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती.
या अगोदर जेव्हा उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून तिकीट न दिल्यास काय करणार? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा “यावर बोलण्याची ही वेळ नाही. त्याबद्दल मला आता बोलण्याची गरज नाही.”, असे उत्पल पर्रिकर म्हणाले होते. तसेच, “मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. मला त्याच पद्धतीने काम करावे लागेल. मला काही कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि त्याच्यासाठी शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतो. मला हे निर्णय घ्यावे लागतील. मी पक्षाला सांगितले आहे आणि मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल. माझा विश्वास आहे,” असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.
पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मनोहर पर्रिकर यांनी अनेकदा केलेले आहे. २०१९ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा पणजीची जागा काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात यांच्याकडून हरली होती. अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उद्योगपती उत्पल पर्रिकर यांनी मार्च २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.