गोव्यात भाजपाला बहुमत मिळालं असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गोवा भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेकडून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Goa Election Results : शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी – फडणवीस

“भाजपाने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो, हे खरंय. पंजाबमध्ये भाजपाची या पेक्षा वेगळी अवस्था नाही. पंजाबमध्ये एक राष्ट्रीय पक्ष मोदी आणि शाह यांचाच चेहरा तरी पंजाबमध्ये भाजपाला, कोणत्या प्रकारचं यश मिळालं? याचं त्यांनी उत्तर द्यावं. नोटापेक्षा कमी मतं मिळाली हे खरंय कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरीही आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरूच राहील, कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो ती सुरुवात असते. भाजपाचा जो विजय आहे तो त्यांच्या उत्कृष्ट निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे, असं मी मानतो. ” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचं निवडणूक व्यवस्थापन पंजाबमध्ये ठीक राहीलं नाही –

तसेच, “पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विजय झाला आहे. राजकारणात, लोकशाहीत ज्यांचा विजय होतो, त्यांचे अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षांनी विजय मिळाला आहे, मी त्यांचे पक्षाच्यावतीने अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेस जो सर्वात मोठा पक्ष होता, त्यांचा अतिशय वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजयी होण्याची त्यांना अपेक्षा होती, मात्र पराभव झाला आहे. अखिलेश यादव आणि त्यांच्या आघाडीची चांगली कामगिरी राहील अशी अपेक्षा होती. मी कामगिरीबाबत बोलत आहे, मात्र अपेक्षे पेक्षा कमी कामगिरी झाल्याची दिसत आहे. जिथे जिथे लोकाना एक पर्याय मिळाला आहे, तिथे लोकानी पर्याय निवडला आहे. जसं की पंजाबमध्ये पर्यात मिळाला, दिल्लीहून एक पार्टी तिथे गेली केजरीवाल यांची, दिल्लीत केजरीवाल यांनी जे काम केलं होतं, त्याचाही फायदा झाला. काँग्रेसचं निवडणूक व्यवस्थापन पंजाबमध्ये ठीक राहीलं नाही. ” असं संजय राऊत माध्यांमांशी बोलताना म्हणाले.

पराभव पचवणं सोपं असतं अनेकदा काही लोकाना विजय पचवता येत नाही –

याचबरोबर “उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्यांना यश मिळू शकलं नाही, याचा अर्थ लढाई संपली असं होतं नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथं जिथं निवडणूक लढलो, ती आमची सुरुवात आहे. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू. अर्थात या निकालामुळे जरी भाजपा खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी, त्यांनी विजय पचवायला शिकलं पाहिजे. पराभव पचवणं सोपं असतं अनेकदा काही लोकाना विजय पचवता येत नाही. विजयाचं अजीर्ण होतं आणि अजीर्ण झाला की त्रास होतो. माझी अपेक्षा आहे हा लोकानी दिलेला जो विजय आहे, तो तुम्ही पचवा आणि पुन्हा एकदा त्या राज्यांमध्ये सूडाने राज्यकारभार न करता, लोकशाही मार्गाने काम करा, देशाचं आणि राज्याचं हीत पाहा एवढंच मी सांगतो. निकाल हा जनतेचा कौल आहे तो स्वीकारायचा असतो आणि पुढे जायचं असतं. ” असं संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

काँग्रेसला यापुढे त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल –

तर, “दिल्लीत आता संसद सुरू होईल, तेव्हा आम्ही एकत्र भेटू काही चर्चा होतील. उत्तर प्रदेशमध्ये जर चांगल्याप्रकारे विरोधी पक्षांचं व्यवस्थापन झालं असतं, विशेषता काँग्रेसला बरोबर घ्यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. ते जर घेतलं असतं अखिलेश यादव यांनी, तर कदाचित त्यांची कामगिरी अधिक चांगली दिसली असती. कारण, प्रियंका गांधी यांनी ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं होतं. त्याचा फायदा विरोधी पक्षांच्या आघाडीला नक्कीच झाला असता. काँग्रेसला यापुढे त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल. आम्ही गोव्यात एकत्र येऊन लढण्याचा खूप प्रयत्न केला, नक्कीच फायदा झाला असता. उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी आमची अपेक्षा होती. पण तिथेही आम्हाला यश मिळालं नाही. भविष्यात आम्ही विरोधी पक्ष एकत्रितपणे देशभरात कशा प्रकारे काम करता येईल, यासाठी चर्चा करू. काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल. ” अशा शब्दांमध्ये संजय राऊतयांनी काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa election results it is true that we got less votes than nota because sanjay rauts reply to devendra fadnavis msr