पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून, चार राज्यांमध्ये भाजपाला तर एका ठिकाणी आम आदमी पार्टीला यश मिळालेलं आहे. गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करत आहे, या ठिकाणी भाजपाला २० जागांवर विजय मिळाला असून, मगोप आणि तीन अपक्ष आमदरांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. तर, गोवा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधीर पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शिवाय, उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनाच्या वाट्याला अपयशच आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. “ही तर सुरुवात आहे. आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल.” असं आदित्यठाकरे म्हणाले आहेत.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “विजयी झालेल्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी मतदारांना आश्वासनं दिलेली आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत ही आमची शुभेच्छा आहे. जे या निवडणुकीत लढले त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. हिमतीने, ताकदीने लढले मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे निकाल आहेत सर्वांच्या डोळ्यासमोर आहेतच. पण कुठेही नैराश्याचं वातावरण नाही. आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने तिथे लढलो. बाहेर प्रचाराला गेलो. ही सुरुवात आहे मला वाटतं सुरुवात करणं गरजेची असते, कधी ना कधी प्रत्येक पक्षाने अशी सुरुवात केलेली आहे.”
Goa Election Results : शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी – फडणवीस
तसेच, “बाहेरच्या इतर सर्व निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि या मतावर आम्ही ठाम आहोत. कधीतरी पर्याय म्हणून तिथे उभा राहू हा एक विचाराने आम्ही तिथे जात आहोत. आम आदमी पार्टी पंजाबमध्ये पर्याय म्हणून उभी राहीली आहे.” असंही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर, “गोव्यात पुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेवर मतांच्या मार्फत विश्वास वाढलेला दिसेल. आम्ही आणखी लढू. कधी ना कधी यश येईल. आपण देशात अनेक पक्ष बघितलेले आहेत की ज्यांचं अस्तित्व सुरुवातील अगदी थोड्याफार प्रमाणात होतं, नंतर ते वाढले आहेत. कधी ना कधी सुरुवात करावी लागेत तशी आम्ही सुरुवात केलेली आहे.” अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.