नवी दिल्ली : गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. याच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने भाजपचे सरकार येईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले तर १० मार्चला निकाल जाहीर होत असून, राजकीय पक्षांनी सत्तेसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. गोव्यात सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस असाच सामना असला तरी काही मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेस-मगोप आघाडीने चुरस निर्माण केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या वेळी म्हणजे २०१७ मध्ये काँग्रेसने सर्वाधिक १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.
काँग्रेसकडून निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये निरीक्षक
नवी दिल्ली: निकालापूर्वीच काँग्रेसने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये निरीक्षक म्हणून पाठवले आहे.कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार हे गोव्यासाठी विशेष निरीक्षक आहेत, तर सरचिटणीस मुकुल वासनिक, छत्तीसगढचे आरोग्य मंत्री टी.एस.सिंहदेव व व्हीन्सेंट पाला यांची मणिपूरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबमध्ये सरचिटणीस अजय माकन व प्रवक्ते पवन खेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य दीपेंदरसिंह हुडा हे उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. उत्तराखंडमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी समन्वय साधून पुढील निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी स्पष्ट केले. निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास फाटाफूट होऊ नये म्हणून काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे. गरज भासल्यास काँग्रेस आमदारांना राजस्थान किंवा छत्तीसगढमध्ये नेण्याची योजना आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये गोवा तसेच उत्तराखंडमध्ये चुरशीची लढत असल्याचा अंदाज वर्तविला आहे.