लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४५+ चा नारा दिला आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती आहे. महायुतीचे ४५ पेक्षा जास्त उमेदवार निवडणून येतील अशी खात्री महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. प्रचाराच जोर विविध ठिकाणी दिसून येतो आहे. महायुतीची सभा अकलूज या ठिकाणी पार पडली. त्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“माळशिरसनी निर्णय केला आहे माढ्याचा निकाल काय लागणार. आज सभेला गर्दी झाली ती गर्दीच हे दाखवून देते आहे. रणजीत सिंग नाईक निंबाळकर तुम्ही चिंता करु नका. मला आज एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही. मला तो दिवस आठवतो आहे की शरद पवारांनी ज्या दिवशी यांची दुकानदारी बंद केली, राजकारण संपवलं होतं. संस्था संपवल्या होत्या, कारखाने संपवले होते. त्यावेळी आमच्याजवळ ही मंडळी आली. आम्ही हा विचार केला आपण यांना जवळ केलं पाहिजे कारण घराण्याची पुण्याई आहे. त्या काळात आम्ही हा निर्णय घेतला की त्यांना जवळ केलं. फक्त जवळ केलं नाही तर राजकीय पुनर्वसनही केलं. सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही कारण जे केलं ते उगाळणाऱ्यांपैकी मी नाही. एकच सांगतो की यांचं पुनर्वसन मोदींमुळे शक्य झालं. पण मोदींना मदत करण्याची वेळ आली तेव्हा यांनी शरद पवारांचा हात पकडला. पुन्हा त्यांच्याबरोबर गेले. पण मी चिंता करत नाही. मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनात मोदी आहेत. जनतेच्या मनातून मोदींना कुणीही काढू शकत नाही.”
शरद पवारांवर टीका
“रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी संघर्ष केला आहे. त्यांनी पाणी आणलं, रेल्वे आणण्याचं काम केलं. निंबाळकरांना मतं देऊ नका हे शरद पवार सांगत आहेत कारण जे पवारांना जमलं नाही ते पाच वर्षांत तुम्ही करुन दाखवलं आहे. त्यामुळे पवारांना वाटतं की काहीही झालं तरीही निंबाळकरांना पाडा, कारण पुन्हा निवडून आले तर ते दुकानं बंद करतील.”
माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतोच
“आता तुमच्याकडचे काही पोपटही बोलू लागले. विमानात बसून दादाच त्यांना घेऊन गेले. ते आता अजित पवारांवर बोलतात, अजून कुणावर बोलतात. त्यांना हे माहीत नाही की हीच जनता आहे ज्यांनी त्यांना निवडलं होतं. ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठिशी राहणार नाही. तसंच एक तुम्हाला सांगतो मी कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा. मी काहीच करत नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते छक्के-पंजे हे काही जमत नाही. याला गाड, त्याला पाड हे कधीच केलं नाही. आई तुळजाभवानीचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याशी विश्वासघात केला की सत्यानाश झालाच, होतोच.” असं फडणवीस म्हणाले आहेत.