मुंबई : शहरातील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीसाठी केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपने सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीस उमेदवारी न मिळालेल्या खासदार गोपाळ शेट्टी व उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूनम महाजन यांनी दांडी मारली. शहरातील प्रत्येक निवडणूक केंद्रावर ३७० हून अधिक मते मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
हेही वाचा >>> पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक
महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, सहप्रभारी निर्मल कुमार सुराणा व जयभान सिंह पवैया, महाराष्ट्र निवडणूक समितीप्रमुख श्रीकांत भारतीय, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक आढावा बैठक मुंबई भाजप कार्यालयात झाली. या बैठकीत प्रत्येक बूथवर ३७० हून अधिक मतांचे नियोजन करण्याबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.
भाजपचा स्थापना दिन ४ एप्रिल रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त मुंबईत ४०० विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवाही उत्साहाने साजरा केला जाणार असून हिंदूत्वाची गुढी घरोघरी उभारण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे. रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही शेकडो कार्यक्रम शहरात होणार आहेत. त्याच्या नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाली.
उत्तर मध्य मतदारसंघात कोणालाही उमेदवारी घोषित झाली नसून महाजन यांनी १३ मार्चपासून मतदारसंघात फिरणेही थांबविले आहे.