पणजी : गोव्याचे आदिवासी विकासमंत्री आणि अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७च्या निवडणुकीनंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता.
राज्यातील भाजप सरकारने मोठय़ा प्रमाणात विकासाची कामे केल्याचे गावडे यांनी भाजपप्रवेशानंतर सांगितले. प्रियोळ मतदारसंघातून गावडे २०१७ मध्ये विजयी झाले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१७ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ज्या दोन अपक्षांनी पाठिंबा दिला त्यात गावडे यांचा समावेश होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतरही गावडे यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले. गेल्या काही दिवसांत चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात काँग्रेसचे रवी नाईक, गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर तसेच अपक्ष रोहन खुंटे आणि आता गावडे यांचा समावेश आहे. तर भाजपची साथ माजी मंत्री मायकेल लोबो, अलिना साल्ढाणा, कार्ल्स अलमेडा तसेच प्रवीण झांटय़े यांनी सोडली आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठय़ा प्रमाणात पक्षांतरे सुरू आहेत.