बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार गोविंदाने २८ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला. गोविंदा पूर्वी राजकारणात होता. त्याने २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करत गोविंदाने संसदेत प्रवेश केला होता. मात्र २००९ नंतर गोविंदाने राजकारणाला रामराम करत पुन्हा एकदा बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. मात्र बॉलिवूडमधील सेकेंड इनिंगमध्ये अपयशी ठरलेल्या गोविंदाने आता पुन्हा एकदा राजकारणाचा मार्ग स्वीकारला आहे.
दरम्यान, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशाच्या आधीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की, त्याला महायुती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल. शिंदे गटाकडून त्याला मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं. मात्र, गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे आणि गोविंदाने निवडणुकीबाबतच्या अफवांचं खंडण केलं. तसेच गोविंदा गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या शिंदे गटातील उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करत आहे.
गोविंदाने राजकीय मैदानात पुन्हा एंट्री केली असली तरी त्याने काँग्रेस का सोडली, राजकीय प्रवेशासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचीच निवड का केली? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. यावर गोविंदाने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाने काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्याने सांगितलं की, शिवसेनेचा शिंदे गट हे एक कुटुंब असल्यामुळेच मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> “राज ठाकरे म्हणाले होते दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता…”, ठाकरे गटाचा सवाल
गोविंदा म्हणाला, महाराष्ट्रासाठी, इथे येणाऱ्या लोकांसाठी शिवसेना हा पक्ष नाही, हे एक कुटुंब आहे. तर,एकनाथ शिंदे हे तुमच्यासाठी आणि इतरांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. परंतु, आमच्यासाठी कुटुंबप्रमुख आहेत. ते ठाण्याचे आणि मी विरारचा… म्हणजे आम्ही एकाच परिसरातले आहोत. विरार आणि ठाणे एकच आहे. एकनाथ शिंदेंशी वैयक्तिक संबंधदेखील आहेत. बऱ्याचदा राजकीय लोकांचे विचार बदलतात, त्यांच्या धारणा बदलतात, व्यवहार बदलतात, मात्र एकनाथ शिंदे तसे नाहीत. तसेच एकनाथ शिंदेकडे एक धार्मिक दृष्टीकोन आहे आणि धर्माबरोबर राहणारे लोक मला आवडतात. कारण माझीदेखील एक धार्मिक धारणा आहे. मात्र पूजा-प्रार्थनेबरोबरच व्यवस्था चालवण्याची क्षमता हवी, धाडस हवं, जे एकनाथ शिंदेंकडे आहे. म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. यासह आई वडिलांची सेवा करणारा मुलगा पाहिला की मला तो माझ्या गटातला माणूस वाटतो.