गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे (आप) इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले आहे. ‘आप’कडून शुक्रवारी तशी घोषणा करण्यात आली. मात्र एकीकडे ही घडामोड घडल्यानंतर दुसरीकडे ‘आप’ला निवडणुकीच्या तोंडावर एक धक्काही बसला आहे. कारण, पक्षाचे नेते इंद्रनील राजगुरू यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
हेही वाचा – दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसने ४३ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
खरंतर आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी इंद्रनील राजगुरू यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि केजरीवालांशी हातमिळवणी केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आम आदमी पार्टीकडून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नावाचा विचार होईल अशी इंद्रनील राजगुरू यांना अपेक्षा होती, मात्र इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘आप’कडून पुढे आणले गेल्यानंतर ते प्रचंड नाराज झाले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा – ‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसी करताना इंद्रनील राजगुरूंनी सांगितले की, ते नेहमीच काँग्रेससोबत होते आणि त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर त्यांचे कुटुंबही सहमत नव्हते. “मी भाजपाला हरवण्यासाठी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र मला असं जाणवलं की ते भाजपाप्रमाणेच जनतेची दिशाभूल करत आहेत. ” राजगुरु हे माजी आमदार आहे जे राजकोटचे रहिवासी आहेत आण सौराष्ट्र भागातील एक प्रभावशाली नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं.
याशिवाय आम आदमी पार्टीची यावरील प्रतिक्रिया समोर आली आहे. इंद्रनील राजगुरु यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवले नाही म्हणून ते आम आदमी पार्टीवर नाराज होते, आप’कडून सांगण्यात आलं आहे. तर काँग्रेसने अद्यापपर्यंत आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. काल रात्री उशीरा काँग्रेसकडून ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.