लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यापैकी तीन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९३ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये महाराष्ट्रात ११ आणि गुजरातमध्ये २५ जागांसाठी हे मतदान झाले आहे. मात्र, गुजरातमधील तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या तीनही गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दिवसभर एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमध्ये लोकसभेच्या २५ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. मात्र, यानंतर गुजरातमधील तीन गावं चर्चेत आले आहेत. यामध्ये भरूच जिल्ह्यातील केसर गाव, सुरत जिल्ह्यातील संधारा आणि बनासकांठा जिल्ह्यातील भाकरी गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याबरोबरच जुनागड जिल्ह्यातील भटगाम गाव आणि महिसागर जिल्ह्यातील बोडोली आणि कुंजरा गावातील मतदारांनीही काही प्रमाणात बहिष्कार टाकला.

हेही वाचा : उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात बत्तीगुल, भर मंचावर अंधार झाल्यावर म्हणाले, “हमको रोक सके किसी अंधेरेमें…”

केसर गाव, संधारा, भाकरी या तीन गावातील एकाही नागरिकाने मतदान केले नाही. तीन गावामध्ये मिळून जवळपास एक हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. मात्र, एकही मतदार मतदान केंद्राकडे न फिरकल्यामुळे दिवसभर मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. पण त्यानंतरही येथील मतदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

मतदारांनी बहिष्कार का टाकला?

या तीनही गावातील लोकांचे म्हणणे आहे, सरकारकडून आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे विकासकामे नाही तर मतदान नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली. भाजपाचे उमेदवार भरतसिंह डाभी यांनीही या गावात पोहोचून लोकांना मतदान करण्याची विनंती केली. पण तरीही लोकांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी ७ मे रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी अंदाजे ६२.२७ टक्के इतकी आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat three villages boycott lok sabha election 2024 marathi news gkt