आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मदत करतो, तुम्ही आम्हाला विधानसभा निवडणुकीत मदत करा, त्यावेळी मदत केली नाही तर लक्षात ठेवा, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळ्यांचं ‘आय लव्ह यू’ असतं मात्र विधानसभेच्या वेळी ‘आय हेट यू’ होतं, असंही पाटील म्हणाले आहेत. जळगावमधील एका प्रचारसभेत बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट आणि महायुतीतील इतर पक्षांना इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्या (महाराष्ट्र विधानसभा) निवडणुकीच्या वेळी सर्वजण एकमेकांच्या विरोधात उभे असतात. मात्र खासदारकीच्या वेळी दुश्मन के दुश्मन भी दोस्त बन जाते हैं (एकमेकांचे शत्रूदेखील मित्र होतात). आज मंचावरच बघा… शिरीष दादा आणि अनिल भाऊ एकत्र बसलेत, त्यांचं आय लव्ह यू चाललंय, पलीकडच्या मतदारसंघात गेलो तर तिकडे किशोर आप्पा आणि अमोल शिंदेंचं आय लव्ह यू आहे. इथे गुलाबराव पाटील चंद्रशेखरराव यांचं आय लव्ह यू आहे. हे सगळं खासदारकीच्या (लोकसभा) निवडणुकीच्या वेळी आय लव्ह यू चालू असतं. मात्र विधानसभेच्या वेळी आय हेट यू होऊन जातं.

लोकसभा निवडणुकीला सगळे आय लव्ह यू करतात कारण लोकसभेची निवडणूक ही काही सटरफटर निवडणूक नाही, ही काही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही निवडणूक म्हणजे देशाचे नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे एरवी आमची तोंडं वाकडी असली तरी देशाचं नेतृत्व ठरवण्यासाठी आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येऊन देशाचे नेतृत्व ठरवणार आहोत ही महत्त्वाची बाब आहे.

हे ही वाचा >> Malegaon Blast: “हिंदुत्ववादी संघटनांची नावं घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता”, आरोपी प्रसाद पुरोहितचा जबाब

दरम्यान, गुलाबरावांनी बुधवारी (७ मे) पिंपरी येथे मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असं पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटतं. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहणारे अनेक ‘मुंगेरीलाल’च आहेत. जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटतं. त्यामुळे मोदींना मतदान करा, त्यांना जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, ही मोदींची हमी आहे. ज्यांच्याकडे पाच-दहा खासदारही नाहीत, असे इंडिया आघाडीतील काही नेते पंतप्रधान झाल्याचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहात आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil told bjp we will help you in lok sabha election you should support shivsena in asembly polls asc