Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर देशभराचं लक्ष लागून आहे. आतापर्यंतच्या मतमोजणी कलानुसार काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. दुसरीकडे जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) २६ जागांवर आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस किंवा भाजपाने युतीसाठी संपर्क केला का? अशी विचारणा केली. यावर कुमारस्वामींनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (१३ मे) माध्यमांशी बोलत होते.
एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, “आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. एक्झिट पोलनुसार आपला वेगळ्या पर्यायांची गरज राहणार नाही. त्यामुळे निकाल काय लागतो ते पाहुयात. आणखी २-३ तासात चित्र स्पष्ट होईल. मी माझ्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नाही. एक्झिट पोलनुसार माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. आम्हाला चांगल्या निकालाची आशा आहे. आमचा एक छोटा पक्ष आहे. त्यामुळे आमची कोणतीही मागणी नाही.”
“एक्झिट पोलनुसार दोन्ही राष्ट्रीय पक्षांना जास्त जागा मिळतील. जनमताच्या कौलात जेडीएसला केवळ ३०-३२ जागाच मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माझा पक्ष एक लहान पक्ष आहे. माझी कुणाकडे काहीही मागणी नाही,” असंही कुमारस्वामी यांनी नमूद केलं.
कर्नाटक निकालाचे कल जाहिर होताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता.”
“मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारावा”
“कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.