Harshada Wanjale speaks for MNS Khadakwasala Candidate Mayuresh : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथून मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) राज ठाकरे यांनी खडकवासल्यात मयुरेशसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी, मयुरेशची आई हर्षदा वांजळे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं. हर्षदा वांजळे म्हणाल्या, आज या सभेला संबोधित करताना मला रमेश वांजळे यांची खूप आठवण येत आहे. मात्र, ते आजही आपल्यातच उपस्थित आहेत असं मला वाटतं. कधी कधी मला त्यांची उणीव भासते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही सर्वांनी रमेश वांजळे यांच्यावर विश्वास दाखवला होता. तोच विश्वास तुम्ही यावेळी मयुरेशवर दाखवाल, अशी मला अपेक्षा आहे. राज ठाकरे यांनी मयुरेशवर विश्वास दर्शवला आहे. मयुरेश राज ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवेल, याबाबत माझ्या मनात जरा देखील शंका नाही. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन या आपल्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून मयुरेशला भरपूर मतांनी विजयी करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश वांजळे यांच्या पत्नी म्हणाल्या, “मला आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आहे की आपल्यासमोर जे उमेदवार आहेत, ते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही त्यांच्या दमदाटीला भीक घालू नका. न घाबरता मयुरेशसाठी काम करा. तुमचा तडफदार, शिकलेला उमेदवार विधानसभेत पाठवा. मयुरेशचा प्रचार करत असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमची आई उभी आहे. मी केवळ मयुरेशची आई नाही, मी तुमची देखील आई आहे. तुमच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तरी त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही”.

हे ही वाचा >> अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

हर्षदा वांजळे म्हणाल्या, समोर कोणीही असो, तुमच्या मदतीसाठी मयुरेश तर आहेच, पण मी देखील तुमच्या बरोबरच आहे. मी तुम्हाला विनंती करते, मागच्या वेळी समोरचे उमेदवार केवळ २,६०० मतांनी जिंकले आहेत. येत्या २० तारखेला तुम्ही मयुरेशवर भरभरून मतदान करा आणि त्याला जिंकवा.

“रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण

खडकवासल्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेशला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं मांझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे हाच आला आहे. कारण हा त्याच्यासारखाचं दिसतो. मला तो दिवस अजही आठवतो. रमेश वांजळे शेवटचं कोणाशी बोलले असतील तर ते माझ्याशी बोलले. मी तेव्हा फोन केला होता, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी रुग्णालयात आलो असून एमआरआय काढायचा आहे. एमआरआय झाला की १० मिनिटात तुम्हाला फोन करतो, मी तेव्हा त्यांना म्हटलं की हो फोन करा मला, जरा महत्वाचं बोलायचं आहे. मात्र, त्यानंतर मला १५ ते २० मिनिटांनी फोन आला आणि सांगितलं की ते आपल्यात राहिले नाहीत. तेव्हा मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मला बाकीचे अनेक जण सोडून गेले. पण आज रमेश वांजळे माझ्याबरोबर असते.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshada wanjale speech for mayuresh mns raj thackeray khadakwasala assembly election 2024 asc