Harshwardhan Jadhav : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली आणि त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. २३ नोव्हेंबरच्या निकालात महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. यानंतर या निकालांमध्ये काहीतरी गडबड आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संख्येबाबत सविस्तर पोस्ट लिहून फरक विचारला आहे. तर दुसरीकडे एका माजी आमदाराने विधानसभा निवडणूक निकाल ईव्हीएम घोटाळायुक्त आहे असा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीतल्या कुठल्या पक्षांना किती मतं मिळाली

भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४१ आमदार
मित्रपक्ष -९ आमदार

अशा एकूण २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे. दरम्यान कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ( Harshwardhan Jadhav ) यांनी ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असल्याचं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Jitendra Awhad on EVM: “मतदान झालं ३१२, मतमोजणीत निघाले ६२४”, जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी

काय म्हटलं आहे अविनाश जाधव यांनी?

कन्नडची निवडणूक आणि त्या ठिकाणी झालेली मतमोजणी याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रश्न या मतदार संघातही आहेत. ईव्हीएम संदर्भातल्या प्रश्नांसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. येत्या काळात ईव्हीएमच्या संदर्भात अनेक गोष्टी आगामी काळात समोर येतील. कारण अनेक गोष्टी या मानवी चुका झाल्या आहेत म्हणून समोर येत आहेत. आमचं लिहितांना चुकलं आणि दुरुस्त केलं हे पुढे येतं आहे. मतदानाच्या दिवशी मोजणी सुरु असताना जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली ती नेमकी वाढली कशी? त्यावर हे उत्तर देण्यात आलं की सुरुवातीच्या संख्या चुकल्या होत्या आणि आम्ही त्या आता दुरुस्त केल्या. निवडणूक आयोगाकडून संख्या देताना इतका हलगर्जीपणा कसा होतो? हा पोरखेळ झाला आहे. असं हर्षवर्धन जाधव यां ( Harshwardhan Jadhav ) नी म्हटलं आहे.

ईव्हीएम घोटाळायुक्त निवडणूक आणि निकाल

“येत्या काही दिवसांमध्ये राज्यात हे प्रश्न चर्चेत येतील. ही निवडणूक आणि निकाल ईव्हीएम घोटाळा युक्त असलेली निवडणूक आहे. ह्युमन एररचं कारण सांगितलं जातं आहे जे असू शकत नाही. कारण हा निवडणूक आयोग आहे. चौपाटीवर बसून चूक झाली असं सांगण्यात येण्याइतकं सोपं नाही. घोटाळा कुठे झाला हे शोधावं लागेल. ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त निवडणूक असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे.” असंही हर्षवर्धन जाधव ( Harshwardhan Jadhav ) यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshwardhan jadhav said election result was tempered by evm serious allegation scj