महाविकास आघाडीला निकालातून सूचक इशारा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही भाजपला मोठा फटका बसला होता.

mahavikas aghadi
महाविकास आघाडीला निकालातून सूचक इशारा (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही भाजपला मोठा फटका बसला होता. राज्याची सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान असतानाही भाजपला यश मिळाले. महाराष्ट्र आणि हरियाणातील राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी हरियाणाच्या निकालाने राज्यात सत्ताबदल होणारच या आशेवर असणाऱ्या महाविकास आघाडीला सूचक इशारा मानला जातो.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे संख्याबळ २३ वरून नऊपर्यंत घटले होते. त्याच वेळी हरियाणामध्येही भाजपच्या खासदारांचे संख्याबळ १० वरून पाचपर्यंत घटले होते. विधानसभेची निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदल करून भाजपने सरकारच्या विरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा फारसा परिणाम लोकसभा निवडणुकीत जाणवला नव्हता. पण लोकसभेतील पराभवानंतर हरियाणात भाजपने चुका दुरुस्त केल्या. विविध समाज घटकांना खूश करणारे निर्णय घेतले. जातीय ध्रुवीकरणावर भर दिला. त्याचा भाजपला फायदा झाला. प्रतिकूल परिस्थिती असतानाही २०१४ आणि २०१९च्या तुलनेत भाजपला अधिक जागा मिळाल्या. सत्तेची हॅटट्रिक पूर्ण केली.

हेही वाचा : १८ हजार कोटींची तरतूद, ६४ हजार कोटींचे कार्यादेश; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर कंत्राटदारांचा आरोप

राज्यातही लोकसभा निवडणुकीत महायुती व विशेषत: भाजपला मोठा फटका बसल्याने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या. राज्यात सत्ताबदल होणारच, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची ठाम भावना झाली. मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाले. अजूनही जागावाटपावर सहमती होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या निकालाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा मिळाला असेल. लोकसभा निवडणुकीत हरियाणामधील मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात नाराजी होती. त्याच राज्यात पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला निर्णायक कौल दिला. महाराष्ट्रापेक्षा हरियाणामध्ये भाजपच्या विरोधात अधिक नाराजी होती. शेतकरी वर्ग विरोधात गेला होता. खेळाडू, अग्निवीर योजनेवरून युवक हे वर्गही विरोधात होते. तरीही सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले. बिगर जाटविरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश आले. राज्यातही मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी असे विविध समाज आरक्षणाच्या मुद्द्यांवर आक्रमक झाले आहेत. त्याचा महाविकास की महायुती फायदा उठवते यावर सारे अवलंबून असेल. हरियाणाच्या निकालाने महायुतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेषत: भाजपने हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला हरियाणाच्या निकालाचा बोध घेऊन व्यूहरचना आखावी लागणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील जनता शिंदे आणि भाजपच्या भ्रष्ट सरकारला कंटाळलेली आहे. असंवैधानिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या सरकारला जनता पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे हरियाणाच्या निकालाचा राज्यावर परिणाम होणार नाही. नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Haryana assembly election result is warning for mahavikas aghadi in maharashtra css

First published on: 09-10-2024 at 06:33 IST
Show comments