Haryana Assembly election results Update : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले होते. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, हरियाणात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, तर १० वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, हरियाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. त्यामुळे हरियाणा निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. हरियाणात एग्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरताना दिसत आहेत. मात्र, तरीही अद्याप सर्व जागांवरील निकाल स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे अंतिम निकाल काय येतो? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर अगदी कालपर्यंत काँग्रेसचा विजय होईल. काँग्रेस सत्तेत येईल, असा अंदाज काँग्रेसच्या नेत्यांसह अनेकांनी व्यक्त केला होता. एवढंच काय तर जवळपास सर्वच एग्झिट पोल्सनी काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत मिळेल, असं म्हटलं होतं. काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज एग्झिट पोल्सने व्यक्त केल्यानंतर हरियाणातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चाही सुरु केल्या होत्या. एवढंच नाही तर हरियाणातील काही नेत्यांनी काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र, काँग्रेसच्या सर्व आशेवर आता पाणी फेरले जाण्याची शक्यता असून हरियाणात भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : चेहरे पडले, जल्लोष थांबला, हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार
मतमोजणीत प्राथमिक फेऱ्यात ट्विस्ट
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वात आधी काँग्रेस जवळपास ६० जागांपेक्षा जास्त जागा आघाडीवर होतं. मात्र, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने अचानक जोरदार मुसंडी मारली. दुपारी १ वाजेपर्यंत समोर आलेल्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने ४९ जागांची आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसने ३४ जागांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपाने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या आकडेवारीत अंतिम निकाल आल्यानंतर काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधी काँग्रेस आघाडीवर असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला होता. पण काँग्रेस पिछाडीवर गेल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जल्लोष थांबवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आणखी थोड्या वेळात निकाल स्पष्ट झाल्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आणि भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार का? हे देखील स्पष्ट होईल.
एग्झिट पोल्सनी काय अंदाज व्यक्त केला होता?
न्यूज २४ चाणाक्य एग्झिट पोल्सने भाजपा (एनडीए) १८ ते २४, काँग्रेस (इंडिया आघाडी) ५५ ते ६२, तर रिपब्लिक टीव्ही-पी मार्कने भाजपा (एनडीए) १८ ते २४, काँग्रेस (इंडिया आघाडी) ५५ ते ६२ तर टाईम्स नाऊने भाजपा (एनडीए) २२ ते ३२, काँग्रेस (इंडिया आघाडी) ५० ते ६४, इंडिया टीव्ही-सीएनएक्सने भाजपा (एनडीए) २९, काँग्रेस (इंडिया आघाडी) १९, तर इंडिया टुडे-सी व्होटर्सने भाजपा (एनडीए) : २० ते २८, काँग्रेस (इंडिया आघाडी) ५० ते ५८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.