Haryana Exit Poll Results: हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांनी एग्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. अनेकांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसला बहुमताचा (४६) आकडा सहज पार करणे शक्य आहे, असंच अनेक एग्झिट पोलमधून दिसून आलं. यावेळी हरियाणा विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली ती कुस्तीपटू विनेश फोगटमुळं. नुकतेच ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात धडक देऊनही पदकापासून वंचित राहावं लागल्यामुळं विनेश फोगटची देशभर चर्चा होती. त्यातच तिनं कुस्तीच्या आखाड्यातून थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळं तिच्या कामगिरीकडं संबंध देशाचं लक्ष आहे. एग्झिट पोलच्या अंदाजानुसार विनेश फोगट निवडणूक लढवत असलेल्या जुलाना विधानसभेत मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केलं आहे. आता ८ ऑक्टोबर रोजी निकालात खरं चित्र स्पष्ट होईल.

हरियाणा विधानसभेतील ९० जागांसाठी मतदान पार पडलं. संपूर्ण राज्यात ६७ टक्के मतदान झालं, जे २०१९ पेक्षा किंचित कमी असल्याचं सांगितलं जातं. तर विनेश फोगटच्या जुलाना विधानसभेत ७५ टक्के मतदान झालं आहे. विनेश फोगटच्या विरोधात भाजपाचे उमेदवार योगेश कुमार, जन नायक जनता पार्टीचे विद्यमान आमदार अमरदीप दांडा निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस याठिकाणी तिसऱ्या स्थानावर होती.

हे वाचा >> Haryana Assembly Election 2024 Updates: काँग्रेसने मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा भाजपाचा आरोप, विनेश फोगट म्हणाल्या….

जुलानाचं समीकरण काय?

हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात जुलाना मतदारसंघ मोडतो. जुलाना मतदारसंघ काँग्रेससाठी नेहमीच अवघड राहिला आहे. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या निवडणुकीत काँग्रेसचा इथं विजय झालेला आहे. त्यामुळेच याठिकाणी काँग्रेसने महिला उमेदवार म्हणून विनेशला उतरवलं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त काही ग्रॅम वजन वाढल्यामुळं बाद व्हावं लागल्यानंतर विनेशबद्दल राज्यात सहानुभूती आहे. त्याचा फायदा निवडणुकीत घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचं बोललं गेलं.

हे ही वाचा >> Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात भाजपाची हॅटट्रिक चुकणार; १० वर्षांनी काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता

एग्झिट पोलचे अंदाज काय?

‘जुलाना मांगे गोल्ड’, असे घोषवाक्य घेऊन काँग्रेसनं याठिकाणी प्रचार केला होता. भाजपाची १० वर्षांपासून सत्ता असताना त्यांच्याबद्दल निर्माण झालेला असंतोषाचा लाभ उचलण्याचा प्रयत्न जुलानासह सर्वच मतदारसंघात घेतला गेला. २०१९ च्या निवडणुकीत जुलानामध्ये भाजपाच्या विरोधात मतदान करून जन नायक जनता पार्टीचा उमेदवार जिंकून दिला होता. मात्र सत्ता स्थापनेत दोन्ही पक्षांची आघाडी झाली. यावेळेस मतदानाचा वाढलेला टक्का हा भाजपा आणि जेजेपीच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विनेश फोगट पहिल्याच प्रयत्नात विरोधकांना चितपट करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.