Haryana Assembly Election Results Update: हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. एग्झिट पोल्सनी काँग्रेसला सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मतमोजमीच्या दिवशी सकाळपासून काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करत होते. मात्र प्राथमिक फेऱ्यातच भाजपाने आघाडी घेतल्यामुळे काँग्रेसच्या आनंदावर विरजन पडले. यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश हे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहेत.
जयराम रमेश काय म्हणाले?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाकडे निवेदन देऊन तक्रार करणार आहोत. मतमोजणीच्या दहा ते बारा फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत. पण संकेतस्थळावर चार ते पाच फेऱ्यांचेच आकडे दाखविले जात आहेत. त्यामुळे माध्यमांनीही चुकीच्या बातम्या दाखविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याप्रकारे त्यांनी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणे योग्य नाही.”
हे वाचा >> चेहरे पडले, जल्लोष थांबला, हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार
काँग्रेसने पराभव मान्य केला – भाजपा
जयराम रेमश यांच्या विधानानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, जर जयराम रमेश निवडणूक आयोगावर खापर फोडत असतील तर याचा अर्थ त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. आता १२ वाजून गेले आहेत. आम्ही आता निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर काँग्रेसने पराभवासाठी कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा >> Live : हरियाणात मोठा ट्विस्ट; भाजपाने बहुमताचा आकडा गाठला; काँग्रेस ३५ तर भाजपाची ४९ जागांची आघाडी
काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, निवडणुकीचे वार्तांकन करत असताना माध्यमे यावेळी पहिल्यांदाच थेट मतदान केंद्रावरून आकडेवारी घेत नाहीये तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी दाखवत आहे. मतदानाच्या फेऱ्या १० च्या पुढे पोहोचल्या आहेत. मात्र आयोगाच्या संकेतस्थळावर जुनीच आकडेवारी दिसत आहे. विनेश फोगटचे उदाहरण घ्या. त्यांना पिछाडीवर दाखवले गेले होते. मात्र दहाव्या फेरीनंतर त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अपडेट केली पाहीजे, अशी आमची मागणी आहे.