पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ हा स्फोटक म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानता होता. भाजपचं इथे वर्चस्व होतं. १९९५ ते २०१९ पर्यंत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र २०२३ मध्ये भाजपच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. आता विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यंदाही विधानसभेच्या रिंगणात होते मात्र आता समोर आलेल्या निकालानुसार कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले आहेत तर रवींद्र धंगेकर यांचा पराभूत झाला आहे.
दरम्यान विजयी झाल्यानंतर हेमंत रासने यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एकच जल्लोष केला. यावेळी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “३५ वर्ष ज्या बाप्पाची सेवा करतोय त्या बाप्पानं मला श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे. मागच्यावेळी अपयश आलं पण अपयशातून यशाची मोठी पायरी चढली जाते. ज्या दिवशी परभूत झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून जनतेच्या सेवेसाठी उतरलो, ५० हजार जनतेची आम्ही कामं केली, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.”
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
काही दिवसांपूर्वी कसबा मतदारसंघात भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासाठी आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “आपल्याला माहीत आहे काही दिवसांपूर्वी ‘ॲक्सिडेंटल पीएम’ चित्रपट आला होता. तसाच या कसब्यातही मागच्या निवडणुकीत एक ‘ॲक्सिडेंटल आमदार’ तयार झाला. हा आमदार काम कमी आणि दंगे आणि नाटकंच जास्त करतो. मला वाटते या आमदाराला जर रंगभूमीवर नेले असते तर त्याने ‘तो मी नव्हेच’ हे पात्र छान केले असते.”