देशभरात गुजरात विधानसभा निवडणुकांची एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपाची वाट धरली आहे. खुद्द मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या निवडणुकांमध्ये राज्यात आपली छाप सोडत भाजपाच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत होतं. त्यात काँग्रेसला हा मोठा झटका बसला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपाचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपाचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणाऱ्या २६ नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे.
“भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात”, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केलं आहे.