हिमालच प्रदेशात सध्या भाजपाचं सरकार असून हे कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ताबदलाचा अुनभव असून, यावेळी जनतेचा कल काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. मात्र भाजपाला हिमाचल प्रदेशात सध्या बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे, बंडखोर उमेदवार कृपाल परमार यांनी माघार घेण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचा दावा केला आहे. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
भाजपाचे माजी खासदार परमार यांनी फतेहपूर येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ६३ वर्षीय परमार हे गेल्या एका वर्षापासून पक्षावर नाराज आहेत. पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी न दिल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली होती. त्यांनी आपल्या बंडखोरीसाठी भाजपाध्यत्र आणि आपले जुने वर्गमित्र जे पी नड्डा यांना जबाबदार धरलं आहे.
“नड्डा यांनी १५ वर्षं माझा अपमान केला,” असं परमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. कथित फोन कॉलमध्ये ते पंतप्रधांनाही हे सांगत आहेत. मात्र या फोन कॉलची बंधी भाजपा किंवा पंतप्रधान कार्यालयाने पुष्टी केलेली नाही.
विश्लेषण: बंडखोरी, ‘आप’चे भाजप-काँग्रेससमोर आव्हान! सत्ताबदलाची परंपरा हिमाचलमध्ये तुटणार?
“मी निवडणूक लढणाक आहे, पण भाजपा उमेदवार म्हणून नाही. ही माझ्यातील आणि काँग्रेस उमेदवारातील लढाई आहे,” असं परमार म्हणाले आहेत.
दरम्यान या कथित फोन कॉलमध्ये परमार मोदींकडे नड्डा यांनी गेली अनेक वर्षं आपल्याला बाजूला केल्याचा आरोप केला आहे. “मोदीजी, नड्डांनी १५ वर्ष माझा अपमान केला,” असं ते या फोन कॉलमध्ये सांगत आहेत. यावेळी परमार यांनी आपण या फोन कॉलला कमी लेखत नसून, देवाचा संदेश असल्याचं म्हटलं आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना, परमार यांनी हा खोटा कॉल नव्हता असा दावा केला आहे. ३० ऑक्टोबरला मोदींनी स्वत: आपल्याला फोन केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
“आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकाला ओळखतो. जेव्हा ते (मोदी) हिमाचल प्रदेशचे प्रभारी होते तेव्हा मी उपाध्यक्ष होतो. आम्ही एकत्र भरपूर प्रवास केला असून, एकत्र राहिलोही आहोत. माझे त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना देव मानतो,” असं परमार म्हणाले आहेत.
“मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात आहे. जर तुम्ही एक सेकंद आधी जरी फोन केला असता तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता. पण मला आताच माहिती मिळाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना इतक्या उशिरा सांगणं हादेखील कटाचा भाग असू शकतो,” असा आरोप परमार यांनी केला.
“२०१७ मध्ये नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही. कोणीही मला काय झालं याबद्दल सांगितलं नाही. त्यांनी मला उमेदवारी देणं बंद केलं. पक्षातील लोक माझी खिल्ली उडवू लागले होते,” असं परमार यांचं म्हणणं आहे.
हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठी निवडणूक होत असून यामधील ३० जागांवर भाजपाला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.