पाकिस्तानमधील माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी काही दिवासांपूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर भारतातील विरोधी पक्षांमधील प्रमुख नेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते राहुल गांधींवर टीका करू लागले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरमा यांनी फवाद हुसैन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना टोमणा मारला आहे. सरमा म्हणाले, राहुल गांधी पाकिस्तानी जनतेत लोकप्रिय आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पाकिस्तानमधील निवडणुकीत पराभूत करू शकत नाही.
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या आणि राहुल गांधी त्या निवडणुकीत उभे राहिले तर ते मोठ्या बहुमतासह ती निवडणूक जिंकतील. आम्ही पाकिस्तानात राहुल गांधींविरोधात निवडणूक जिंकू शकत नाही. पाकिस्तानमध्ये राहुल गांधी कोणाविरोधातही निवडणूक जिंकतील. मात्र भारतात ते आमच्याविरोधात जिंकू शकत नाहीत. पाकिस्तानला जे हवं असेल नेमकं त्याच्या उलट भारतात घडेल.
फवाद हुसैन यांनी राहुल गांधींचं कौतुक केल्यानंतर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातच्या आणंद येथे केलेल्या एका भाषणात यावर भाष्य केलं होतं. मोदी म्हणाले, इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान यांच्यासाठी रडतोय.
नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात सध्या काँग्रेस कमकुवत स्थितीत आहे, देशात कुठेही सुक्ष्मदर्शक यंत्राने बघितलं तरी काँग्रेस दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानचे नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला पाकिस्तानबद्दल आपुलकी आहे, हे सर्वांना माहिती आहे.
हे ही वाचा >> मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”
पंतप्रधान म्हणाले, तुम्ही (जनता) लव्ह जिहाद, भूमी जिहाद याबाबत ऐकलं आहे. मात्र, आता इंडी आघाडीच्या नेत्यांनी व्होट जिहाद (मतांचा जिहाद) करण्याचे आदेश दिले आहेत. हे लोक मुसलमानांना एकत्र करून आपल्याबरोबर घेऊन भाजपाविरोधात व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत. इंडी आघाडीतला प्रमुख पक्ष काँग्रेसने यापूर्वीदेखील धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीनंतर ते सत्तेत आल्यास पुन्हा एकदा धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील. मी बोलतोय ते खोटं असेल तर काँग्रेसने याबाबत जनतेला लिहून द्यावं की ते मुसलमानांना माग्या दाराने धर्माच्या आरक्षणावर आरक्षण देणार नाहीत.