लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून पुढचे पाच टप्पे १ जूनपर्यंत पार पडणार आहेत. अशात प्रचाराचा जोर शिगेला पोहचला आहे. अजित पवार हे बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत. आज भाषणात त्यांनी २०१९ ला पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय काय घडलं होतं? तसंच २०१७ ची चर्चा काय होती? हे सांगितलं. शरद पवारांना शिवसेना चालत नाही म्हणून तेव्हा बोलणी झाली नव्हती हेदेखील सांगितलं.
काय म्हणाले अजित पवार?
“२०१७ मध्ये सुनील तटकरेंना शरद पवारांनी दिल्लीत बोलवून घेतलं आणि म्हणाले आपल्याला सरकार बरोबर जायचं आहे. दिल्लीत आमची अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी अमित शाह म्हणाले तुम्ही सरकारमध्ये या, मंत्रिपदंही आम्ही देऊ. पण शिवसेनेशी आमची मैत्री आहे ती मैत्री आम्ही तोडू शकत नाही. पालकमंत्रीपदं देऊ, सगळं देऊ पण आम्ही शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडा म्हणणार नाही. त्यावेळी आमच्या साहेबांनी (शरद पवार) सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही. ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही. अमित शाह म्हणाले मी शिवसेनेला सत्ता सोडा सांगणार नाही. त्यावेळी आम्ही सरकारमध्ये गेलो नाही. वर्षा बंगल्यावर विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली. पण ते सगळं शिवसेना चालत नसल्याने बारगळलं.”
हे पण वाचा- जयंत पाटील यांचं लक्षवेधी वक्तव्य, “..तर एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो”
२०१९ च्या शपथविधीच्या आधी काय घडलं?
“२०१९ ची निवडणूक झाली. त्यावेळी दिल्लीत आम्हाला बोलवलं. प्रफुल्ल पटेल, शरद पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासह बैठक झाली. एका उद्योगपतीच्या बंगल्यावर बैठक पार पडली. पाच ते सहा मिटिंग झाल्या. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण? पालकमंत्री कोण? हे सगळं ठरलं. त्यावेळी मला अमित शाह म्हणाले आम्हाला मागचा अनुभव काही चांगला नाही. पण अजित तू शब्दाला पक्का आहेस. तुझ्यादेखत हे सगळं ठरलं आहे. त्यामुळे हे असंच करायचं. त्यानंतर मी हो म्हटलं.
मुंबईत आल्यावर काय घडलं?
मुंबईत आल्यावर सांगण्यात आलं राष्ट्रपती राजवट आणा. आम्ही म्हटलं कशासाठी? तर त्यावर शरद पवार म्हणाले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणूक होऊ शकते कारण राष्ट्रपती राजवट आली. मग कुणाशी मिळतंजुळतं घेतलं पाहिजे मग आपण भाजपासह जायचं. ते राहिलं बाजूलाच. मग शिवसेना, काँग्रेस आणि आम्हीच चर्चा करायला लावले. त्यावर ते म्हणाले दोन्ही रस्ते फ्री ठेवायचे आहेत. इकडे की तिकडे नंतर ठरवू असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर तो सकाळी ८ चा शपथविधी वगैरे झाला. पुढे काय झालं ते सगळ्यांना माहीत आहेच असंही अजित पवार म्हणाले.