लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हिंदू विरुद्ध मुस्लीम असे मुद्दे सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटावर अनेकविध आरोप केले गेले. महाविकास आघाडीच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले, असाही आरोप सत्ताधाऱ्यांकडून केले गेले. या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते.
मुस्लीम समुदयाबाबत होत असलेल्या टीकेवरूनच ठाकरेंना पहिला प्रश्न विचारण्यात आला. सध्या तुम्ही अल्पसंख्यांकाच्या खूपच प्रेमात आहात. मुस्लमांच्या कल्याणाचे विषय घेत आहात, अशी टीका सातत्याने का केलीज जातेय, असं विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “मला लहानपणी कधी ताजिया मिरवणुकीत सहभागी होता नाही आलं. ती कमतरता आता भरून काढतोय. त्यांचं बालपण मुस्लीम कुटुंबरोबर गेलं आहे. ईदला ते त्यांच्याकडे जेवायचे. त्यांच्याकडे जेवल्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी कशी केली माहीत नाही.”
“त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. १० वर्षांत अभिमानाने सांगावं असं काम झालेलं नाही. दरवेळेला निवडणुका आल्यानंतर त्यांची पिन एकाच ठिकाणी अडकली जाते. २०१४, २०१९ आणि आताही त्यांची पिन अडकली आहे. लहान मुल भूकेने कळवळायला लागल्यानंतर त्याला जेवण दिलं पाहिजे. पण हे लोक त्यांना मुस्लमांनांची भीती दाखवत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> “विदर्भात महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचलेला, तेव्हा प्रबोधनकार ठाकरेंनी…”, तुषार गांधींनी सांगितली आठवण
हीच मोदींची गॅरंटी
“सरकार देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे सांगते. मग भुकेलेल्या कुटुंबांना मुसलमानांची भीती दाखवून किती वेळ शांत बसवू शकता? भाजपाला लोकांच्या आक्रोशाची भीती असून यातूनच मुसलमानांची भीती दाखविली जात आहे. गेली १० वर्षे तुम्ही राज्य करताय. तरीही अजून भीती का वाटते. ही भीती नष्ट का केली नाही? ज्यांची सीबीआय, अंमलबजाणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे, अशा तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची चौकशी थांबवलेली आहे. आता तर आरोप सिद्ध होईपर्यंत ते दोषी नाहीत असा कांगावा केला जात आहे. चौकशी थांबवून, त्यांना अभय दिल्यावर आरोप कसे सिद्ध होणार? याचा अर्थ भ्रष्टाचाऱ्यांचे रक्षण हीच खरी मोदी गॅरंटी म्हणावी लागेल”, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील चित्र काय आहे?
राज्यातील सध्याचे राजकीय चित्र हे पूर्णपणे लोकशाहीचे रक्षण करणारे दिसते. हुकूमशाहीला, गद्दारांना आणि त्यांच्या सूत्रधारांना गाडणारे दिसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या राज्याशी जी गद्दारी झाली ती केवळ शिवसेना फोडण्यापुरती नाही. ज्या राज्याने मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांत मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून ४० पेक्षा अधिक खासदार निवडून दिले, त्याच मोदी यांनी राज्यातील विविध उद्याोग, वित्तीय केंद्र गुजरातला पळवून नेत या राज्याशी मोठी गद्दारी केली. मुंबईतील हिरे बाजार पळवून गद्दारी केल्याने महाराष्ट्र पेटून उठला आहे.