Vote Counting Steps : येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आयोगाकडून यासाठीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टींची खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामध्ये विशेषतः मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. पण, मतमोजणीच्या दिवशी नक्की काय होते? मतांची मोजणी कशी केली जाते आणि ती कोण करते? अशा अनेकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मतमोजणीच्या दिवशी काय होते?
मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू केली जाते. यावेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी ७ वाजल्यापासूनच उपस्थित असतात त्यादरम्यान स्ट्राँग रूमचे कुलूप उघडले जाते. यावेळी निवडणूक आयोगाचे निवडणूक अधिकारी आणि विशेष निरीक्षकही उपस्थित असतात. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट केला जातो. त्यानंतर EVM चे कंट्रोल युनिट मतमोजणी टेबलावर आणले जाते. या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाते. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाते. टेबलावर ठेवल्यानंतर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील जुळतात. प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटलाही ते दाखवले जाते. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बटण दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचे मत त्याच्या नावापुढे EVM मध्ये दिसू लागते.
मतमोजणी केंद्रात कोणाला प्रवेश असतो?
मतमोजणी स्थळाच्या प्रत्येक हॉलमध्ये प्रत्येक टेबलावर उमेदवाराच्या वतीने एजंट उपस्थित असतो. कोणत्याही एका सभागृहात १५ पेक्षा जास्त एजंट उपस्थित नसतात. तसेच मतमोजणी केंद्रात फक्त मोजणी कर्मचारी, रिटर्निंग अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व एजंट यांनाच प्रवेश दिला जातो. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत उमेदवाराच्या एजंटला बाहेर पडू दिले जात नाही. मतमोजणीसाठी तैनात सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यांच्याव्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी नसते.
विजयी उमेदवाराचे नाव कोण जाहीर करते?
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकारी प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची आकडेवारी निकालपत्रात टाकतात आणि नंतर निकाल जाहीर केला जातो. तसेच यावेळी विजयी उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्रही दिले जाते.
हेही वाचा: What are Strong Room: निवडणुकीच्या काळातील ‘स्ट्राँग रूम’ म्हणजे नेमके काय? स्ट्राँग रूमचा वापर कसा केला जातो?
EVM म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र; ज्याला EVM म्हणून ओळखले जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते मोजण्यासाठी वापरली जातात. ईव्हीएममध्ये एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेटिंग युनिट, अशी दोन युनिट्स असतात; जी केबलद्वारे जोडलेली असतात. कंट्रोल युनिट हे पीठासीन अधिकारी किंवा मतदान अधिकारी यांच्याकडे ठेवले जाते; तर बॅलेटिंग युनिट मतदारांना त्यांचे मत देण्यासाठी मतदानाच्या डब्यात ठेवले जाते. त्यामुळे मतदान अधिकारी मतदाराची ओळख पडताळू शकतात.