Baramati : बारामती या हाय व्होल्टेज मतदारसंघाने शरद पवार विरुद्ध अजित पवार ही थेट नसली तरीही अप्रत्यक्ष लढाई लोकसभा निवडणुकीत पाहिली. सुप्रिया सुळेंना कौल देऊन बारामतीकरांनी ( Baramati ) ते शरद पवारांबरोबर आहेत हे लोकसभेला दाखवून दिलं आहे. आता अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात युगेंद्र पवारांना म्हणजेच अजित पवारांच्या पुतण्याला तिकिट दिलं आहे.

बारामतीत काका-पुतणे आमनेसामने

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांचं नाव विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलं. यामुळे बारामतीत ( Baramati ) पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत दिसणार आहे.

युगेंद्र पवार राजकारणात कसे आले?

युगेंद्र पवार राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर राजकारणात आले. फेब्रुवारी २०२४ या महिन्यांत युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले होते की राजकारणात उतरायचं की नाही ते मी अद्याप ठरवलेलं नाही. मी शरद पवारांच्या नवीन ऑफिसबाबत ऐकलं आणि त्यांना भेटायला आलो इतकंच तेव्हा म्हणाले होते. तसंच शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या असंही ते म्हणाले होते. मात्र ही भेट साधीसोपी नव्हती. त्याचवेळी विधानसभा लढवण्याची तयारी करायला युगेंद्र पवार यांना शरद पवारांनी सांगितलं होतं अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.

हे पण वाचा- Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये अजित पवार वि. युगेंद्र पवार लढत निश्चित, रोहिणी खडसेही मैदानात

पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांना मोठा आधार मिळाला तो बारामतीचा

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्याने फुटलेल्या पक्षाची बांधणी केली. तसंच बारामतीत ( Baramati ) सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी जिवाचं रान केलं. बारामतीतून सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार उतरले होते. याबाबत मंगळवारी युगेंद्र पवार म्हणाले, “आम्ही लोकसभेला चांगली कामगिरी केली. तशीच चांगली कामगिरी आम्ही विधानसभा निवडणुकीतही करणार आहोत. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे न्यायचा आहे. शरद पवार जे उमेदवार जाहीर करतील त्यांना मी पाठिंबा देईन” असंही युगेंद्र पवार म्हणाले होते.

अजित पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत

अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक तर गमावली. मात्र विधासनभेला गोष्ट वेगळी आहे. बारामती ( Baramati ) विधानसभा अजित पवार कायमच जिंकत आलेले आहेत. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना तिकिट देऊन कुटुंबातच ती लढत झाली ती व्हायला नको होती असंही स्पष्ट मत अजित पवारांनी जाहीर रित्या मांडलं होतं. आता युगेंद्र पवार अशा अजित पवारांना टक्कर देतील ज्यांनी ही निवडणूक हरलेली नाही. आता यावेळी ते कसा सामना देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उपमुख्यमंत्री या पदावर असलेले अजित पवार हे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी कायमच विकासाचं राजकारण केलं आहे. आता बारामतीत ( Baramati ) विधानसभेला काय होतं हे पाहणं नक्कीच रंजक असेल.