भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) सध्या काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मागच्या दोन टर्मपासून सत्ता भोगणाऱ्या भारत राष्ट्र समितीसमोर काँग्रेस आणि भाजपाने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी तेलंगणाच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी काम केल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी तेलंगणाच्या जनतेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून केसीआर यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर टीका केली.
इंदिरा गांधी यांचा उल्लेख का?
तेलंगणामधील आदिवासी बहुल असलेल्या आसिफाबाद आणि खानापूर मतदारसंघात १९ नोव्हेंबर रोजी प्रियांका गांधी वाड्रा यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वारशाची उजळणी केली. त्या म्हणाल्या, तेलंगणातील लोक आजही स्व. इंदिरा गांधी यांना प्रेमाने “इंदिराम्मा” असे संबोधत आहेत. इंदिरा गांधी यांनी या भागातील आदिवासी लोकांच्या जल, जंगल, जमीनीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काम केले.
“अनेक नेते आले आणि गेले. अनेक नेत्यांनी तुमच्यासाठी काम केले. पण तुम्ही इंदिराजींना का लक्षात ठेवले? तुम्ही आजही त्यांना इंदिराम्मा का म्हणतात? त्यामागचे कारण असे की, त्यांनी तुम्हाला जमिनीचा हक्क दिला. इंदिरा गांधी यांनी गरिबांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भूमिहीन गरिबांना सात लाख एकर जमिनीचे वाटप केले. त्यांनी ‘एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. तसेच आदिवासी बांधवांसाठी लाखो घरे बांधली. त्यांनी आदिवासींच्या संस्कृतीचा आदर ठेवला. ही संस्कृती कशी अलौकिक आहे, याची माहिती त्या आम्हाला नेहमी देत असत”, अशी माहिती प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात दिली.
आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा रायबरेलीमधून पराभव झाला होता. त्यानंतर १९८० सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक मेडक मतदारसंघ सध्याच्या तेलंगणांमध्ये आहे. मेडकमधून (त्यावेळचे एकत्रिक आंध्र प्रदेश) तब्बल २.९५ लाख मतदान घेऊन इंदिरा गांधी यांनी विजय मिळविला होता. आंध्र प्रदेशमधील ४२ पैकी ४१ लोकसभा मतदारसंघात त्यावेळी काँग्रेसचा विजय झाला होता.
१९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली, तेव्हाही त्या मेडकच्या खासदार होत्या.
काँग्रेसने आताही इंदिरा गांधी यांच्या नावाने काही योनजांची घोषणा केली आहे. महिला, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि शेतकऱ्यांसाठी या योजना आहेत.
केसीआर यांचे प्रत्युत्तर
नुकत्याच झालेल्या जाहीर सभांमधून बीआरचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या दाव्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या खासदारकीच्या काळात कुपोषणामुळे मृत्यू झाले, नक्षलवादी चळवळ वाढली आणि न्यायबाह्य हत्या वाढल्या.
रविवारी (१९ नोव्हेंबर) नगरकुरनूल विधानसभा मतदारसंघातील जाहीरसभेत बोलत असताना केसीआर यांनी याचाच पुनरुच्चार केला. “तेलंगणामध्ये इंदिराम्मा राज्य पुन्हा येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. तुम्हाला माहितीये का त्यांच्या राज्यात काय झाले होते? त्यावेळी कुपोषणामुळे मृत्यू झाले, पूर्ण देशात नक्षलवादी चळवळीचा उदय झाला आणि खोट्या चकमकीत अनेक लोकांची हत्या करण्यात आली. काँग्रेसच्या राज्यात अनेक दशके देशातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. आपल्या भागातून अनेक नद्या वाहत असतानाही काँग्रेसला पिण्याचे पाणी इतर भागाला देता आले नाही. काँग्रेस आता कोणत्या आधारावर मते मागत आहे?”, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला.
हे वाचा >> Telangana : प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजा सिंहला भाजपाकडून पुन्हा उमेदवारी
कुपोषणाचा दावा किती खरा?
केसीआर यांच्या दाव्यानुसार, एकत्रित आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या राजवटीत कुपोषणाची समस्या होती. एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वातील तेलगू देसम पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात आला. तोपर्यंत कुपोषणाची समस्या कायम होती. रामाराव यांच्या सरकारने प्रयत्न केल्यामुळे कुपोषणाची समस्या दूर झाली. केसीआर हे पूर्वी तेलगू देसम पक्षाचे नेते होते.
या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने आश्वासन दिल्याप्रमाणे, प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पाच किलो पोषणयुक्त तांदूळ (fortified rice) देण्यात येईल.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा पैलू
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वारश्यावर टीका करत असताना बीआरएसने मागच्या काही वर्षात माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचे मात्र कौतुक केले आहे. नरसिंहराव भूमीपूत्र असल्याचा प्रचार बीआरएसकडून करण्यात येतो. २०२० साली, नरसिंहराव यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. एवढेच नाही तर, नरसिंहराव यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा, अशी मागणीही केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली होती.
आणखी वाचा >> तेलंगणमध्ये काँग्रेसच्या बाजूने लाट – राहुल
जून २०२१ साली, केसीआर यांनी हैदराबादमधील नेकलेस रोड येथे पीव्ही ज्ञान भूमी या नावाने २६ फुटांचा पीव्ही नरसिंहराव यांचा पुतळा उभारला होता.
गांधी परिवाराशी बांधिलकी जपणारे पीव्ही नरसिंहराव हे काँग्रेस पक्षापासून कसे वेगळे आहेत, हे दाखविण्यावर केसीआर यांनी भर दिला. हे पाहून काँग्रेसनेही पीव्ही नरसिंहराव यांच्यावर दावा सांगण्यास सुरुवात केली. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले की, तेलंगणात सत्ता आल्यास माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचे नाव जिल्ह्याला देण्यात येईल. नरसिंहराव यांचा वारंगळ जिल्ह्यात जन्म झाला होता.