Maharashtra Assembly Election 2019 Party Split : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तसेच राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ शिवसेनेने (ठाकरे) ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने ४८, शिवसेनेने (शिंदे) ४५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४८, मनसेने ४७ उमेदवार जाहीर केले आहेत. महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला असून येत्या दोन तीन दिवसांत उर्वरित उमेदवार देखील जाहीर केले जातील. अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत.

राज्याला एका महिन्यात २८८ नवे आमदार आणि नवं सरकार मिळणार असलं तरी सध्या विधानसभेत असलेले आमदार कोण? २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कशी स्थिती होती? याची आपण उजळणी करणार आहोत. सव्वादोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटून दोन गट तयार झाले, पाठोपाठ उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळून राज्यात भाजपा व शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले. यापैकी अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे या पक्षफुटीनंतरची राज्यातील स्थिती कशी झाली आहे? हे देखील जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा >> २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्षांनी मिळून १६३ जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ५४ व काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने भाजपाकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितल्यामुळे व भाजपाने त्यास नकार दिल्यामुळे राज्यात युती सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरली. नंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केलं. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. युतीच्या विघटनामुळे भाजपाला सरकार स्थापन करण्याची संधी गमवावी लागील.

२०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व आमदारांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२०१९ च्या निवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल

  1. भारतीय जनता पार्टी – १०५ आमदार
  2. शिवसेना – ५६ आमदार
  3. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ५४ आमदार
  4. काँग्रेस – ४४ आमदार
  5. प्रहार जनशक्ती पार्टी – २ आमदार
  6. समाजवादी पार्टी – २ आमदार
  7. एआयएमआयएम – २ आमदार
  8. मनसे – १ आमदार
  9. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी – १ आमदार
  10. शेतकरी कामगार पक्ष – १ आमदार
  11. जनसुराज्य शक्ती – १ आमदार
  12. क्रांतीकारी शेतकरी पार्टी – १ आमदार
  13. राष्ट्रीय समाज पक्ष – १ आमदार
  14. अपक्ष – १३ आमदार

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2014 MLA List : महाराष्ट्र विधानसभेत २०१४ ला कोणत्या पक्षाचे किती आमदार होते? कशी पार पडली निवडणूक? वाचा २८८ आमदारांची यादी

पक्षफुटीनंतरचं पक्षीय बलाबल

महायुती

  • भाजपा – १०५ आमदार
  • शिवसेना (शिंदे) – ४० आमदार
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – ४१ आमदार

महाविकास आघाडी

  • काँग्रेस – ४४ आमदार
  • शिवसेना (ठाकरे) – १४ आमदार
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) – १४ आमदार