कोल्हापूरमध्ये काँग्रेसने छत्रपती शाहू यांना उमेदवारी देऊन महायुतीसमोर तगडे आव्हान निर्माण केले. शाहू महाराजांना निवडणुकीत पिछाडीवर टाकण्यासाठी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा वाद उकरून काढला. त्यानंतर ‘मान गादीला आणि मत मोदीला’ अशी घोषणा दिली गेली. आता शाहू महाराजांचा विरोध करण्यासाठी आणि महायुतीचा प्रचार करण्यासाठी धुळ्याचे नेते आणि स्वत: शाहू महाराज यांचे थेट वशंज म्हणवून घेणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये (दि. २७ एप्रिल) रोजी सभा पार पडल्यानंतर राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरात आले असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कदमबांडे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना विविध विषयांवर भाष्य केले. तसेच महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला. “मी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे. मी छत्रपती शाहू यांचा रक्ताचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. १९६२ साली कोल्हापूरात दत्तक घेण्याचे प्रकरण गाजले होते. आताचे छत्रपती शाहू हे खरे वारसदार नाही. ते स्वतःला गादीचे वारसदार म्हणत असले तरी खरा वारसदार कोण? हे जनता ठरवेल”, असे राजवर्धन कदमबांडे म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू यांना एमआयएमने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता कदमबांडे म्हणाले की, कुणाचा पाठिंबा घ्यावा हे शाहू महाराजांनी ठरवायचे आहे. मी धुळ्यातून अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी एमआयएमचा उमेदवार माझ्याविरोधात होता. केवळ २३०० मतांनी तो निवडून आला. भूतकाळात मुघलांनी हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, त्यामुळे अशा लोकांचा पाठिंबा घ्यायचा की नाही, हे त्यांनी (शाहू महाराज) ठरवावे, असेही आवाहन कदमबांडे यांनी केले.

याचवेळी कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी का आले?

राजवर्धन कदमबांडे यांचे वास्तव्य धुळे जिल्ह्यात आहे. तसेच धुळ्याच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. याआधी कदमबांडे कोल्हापूरमध्ये फारसे हस्तक्षेप करत नसत किंवा प्रचारासाठी येत नसत. याचवेळी कोल्हापूरमध्ये महायुतीचा प्रचार करण्यामागे काय कारण? असाही प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारला. त्यावर मी नेहमीच कोल्हापूरमध्ये येत असतो, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच पक्षाने यावेळी जबाबदारी टाकल्यामुळे हातकंणगले आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार करत आहे, असेही ते म्हणाले.

भाजपाने जाणूनबुजून कोल्हापूरात पाठविले का?

यंदा छत्रपती शिवाजी महाराज हे महायुतीच्या विरोधात निवडणुकीला उभे असल्यामुळे भाजपाने मुद्दामहून तुम्हाला प्रचारासाठी पाठविले का? असाही प्रश्न कदमबांडे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, हे पत्रकारानींच ठरविले आहे. मात्र भाजपाही शाहू महाराजांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. भाजपा शाहू महाराजांच्या विचारांच्या विरोधात नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am the blood heir of chhatrapati shahu claims by rajwardhan kadambande in kolhapur rno news kvg
Show comments