Laxman Dhoble : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील पक्षांमधली बंडाळीही समोर येताना दिसते आहे. काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होताना दिसतो आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे विनंती करत आहेत. भाजपाचे लक्ष्मण ढोबळे ( Laxman Dhoble ) हेदेखील कमळ सोडून हाती तुतारी घेणार हे निश्चित झालं आहे. त्यांनी भाजपाला जय महाराष्ट्र करताना अजित पवारांवर टीका केली आहे.
काय म्हणाले लक्ष्मण ढोबळे?
“भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत येऊन रामाची साथ लक्ष्मणाने सोडली. लक्ष्मणाच्या कष्टाचं चिज झालं नाही असं वाटलं. आता स्वामीनिष्ठेने शरद पवारांबरोबर राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार आहे. दोन दिवसांत माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मतदारसंघात जो विद्यमान आमदार आहे त्याची अडचण होऊ नये, त्याला मोकळीक मिळावी म्हणून मी तिथून बाजूला होतो आहे.” असं लक्ष्मण ढोबळे ( Laxman Dhoble ) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- मावळ विधानसभा: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न; आमदार सुनील शेळकेंचा रोख कुणाकडे?
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून निर्णय
“अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी बाजूला होतो आहे समाधान अवताडेंना मी मोकळी जागा या ठिकाणी करुन देत आहे.” असंही ढोबळेंनी ( Laxman Dhoble ) म्हटलं आहे.
मी अजित पवारांना कंटाळूनच भाजपात गेलो होतो
“अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो, आता ते भाजपाबरोबर आले आणि पुन्हा त्रास देऊ लागले. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता पुन्हा मी भाजपा सोडतो आहे, असं म्हणत लक्ष्मण ढोबळे ( Laxman Dhoble ) यांनी तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केलीय. अजित पवारांना वाटतं की पैशांचा जिवावर राजकारण करता येतं, मात्र तसं होत नाही. तुमच्या काकांनी कसं राजकारण केलं ते पाहा, असा सल्लाही ढोबळे यांनी अजित पवारांना दिलाय. तसेच, मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेश निश्चित आहे, अशा शब्दात एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण ढोबळे यांनी नाराजी व्यक्त करत हाती तुतारी घेत असल्याचे जाहीर केलं आहे. लक्ष्मण ढोबळेंनी निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाजपाची अडचण होण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.
© IE Online Media Services (P) Ltd