लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचारसभा आणि मुलाखतींचा धडाका सुरू आहे. अनेक नेतेमंडळी विविध माध्यमांना मुलाखती देऊन आपणच जिंकणार असा दावा करत आहेत. दरम्यान, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या सभेलाही प्रचंड गर्दी होत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. ते टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा आणि आरएसएसच्या त्या पिढीबद्दल आस्था आणि आपुलकी आहे, ज्यांनी आपले घरदार बाजूला ठेवून देशासाठी त्याग केलेला आहे. अनेकजण विवाहित राहिले. मोदीही त्याच पिढीतील. पण त्यांचे संस्कार गेले. मोदी कदाचित कधी स्टेशनवर चहा विकायचे, कधी हिमालयात गेले होते, कधी बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात होते. पण त्यामुळे त्यांना संस्कार वर्गाला जाता आलं नसेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३०-३५ जागा मिळतील असा दावा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी म्हणेन ४८ च्या ४८ जागा येतील. माझं काय मत आहे की मी अंदाजपंचे डाव करत नाही. मी जिंकायच्या इर्ष्येने लढतो. मी कधीच सर्व्हे करत नाही. लढण्यासाठी तलवार पकडायला मनगट पाहिजे. त्या मनगटासाठी पहिलं मन पाहिजे. त्या मनाची ताकद नसेल तर मनगटाला अर्थ नाही. आणि मन खचलं असेल तर मन खचलेल्या मनात तलवार शोभून दिसत नाही. त्यामुळे मी जिंकायच्या इर्ष्येने लढत असतो.”
हेही वाचा >> “…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
मला किंमत शुन्य
तुमच्या सभांनाही गर्दी होते. बॅरिकेट्स तोडून लोक जात आहेत, असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “ते कदाचित माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत. ते मोदींना कळणार नाहीत. हे माझं कर्तृत्व नाही. मी शुन्य आहे. माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मला किंमत आहे, नुसत्या उद्धवला शुन्य किंमत आहे. पूर्वजांची पुण्याई, हे त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांच्याचमुळे मी लढतोय. त्या जोरावर मी लढतोय.”
देवेंद्र फडणवीस यांच्या पाकिस्तानाबाबत केलेल्या विधानाबाबतही उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीसांकडून नवाज शरीफ यांचा नंबर घ्यायचा आहे. कारण पंतप्रधान मोदी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला न बोलवता वाढदिवसाला गेले होते. त्यानंतर आडवणी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर डोक टेकवून आले होते. त्यामुळे पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात फडकतोय.”