राजस्थानात भाजपाची सत्ता येणार हे आता नक्की झालं आहे. कारण भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राजस्थानमध्ये सत्तास्थापनेसाठी १०० ही मॅजिक फिगर आहे. अशात भाजपाने ११० हून अधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. आता पुढच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे होऊ शकतात. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदल होतो तसाच तो यावेळीही बघायला मिळाला आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानची जनता सूड घेईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत अशोक गहलोत?
“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी सगळ्यांनी उत्तम प्रकारे प्रचार केला. आमच्या योजनाही चांगल्या होत्या. आम्ही हवेतली आश्वासनं दिली नव्हती. आता पराभव झाला आहे तर तो स्वीकारला पाहिजे. आम्ही आता लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागणार आहोत. माझं काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगणं आहे की निवडणूक म्हटली की त्यात जय-पराजय होत असतातच. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि बाहेरुन काही मुख्यमंत्रीही आले होते. माझ्यावर जोरदार टीका केली, आमचं सरकार भाजपाला पाडायचं होतं आणि लोकशाहीची हत्या करायची होती. अशा भाजपाला जनता धडा शिकवेल आणि मतपेटीतून त्यांचा सूड घेईल असं वाटलं होतं. मात्र असं घडलं नाही. जनतेने बदला घेतला नाही. कदाचित त्यांना हे समजलं नसावं.” असं वक्तव्य आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट, राजपूत या प्रमुख जातींची अनुकुलता भाजपसाठी सत्ता मिळवून देणारी ठरली. भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.
राजस्थानमधील अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त झालेल्या भाजपाने वसुंधरा राजेंसारख्या दिग्गज नेत्यांची मक्तेदारी मोडून काढत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी दियाकुमारी, बाबा बालकनाथ, विरोधीपक्षनेते राजेंद्र राठोड यांच्यासह केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत ठेवली होती. वसुंधरा राजेंचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या समर्थक आमदारांना उमेदवारी दिली गेली असली तरी, निवडणुकीच्या प्रचारातून राजेंना दूर करून संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढली गेली. राजस्थानमध्ये मोदी हेच भाजपाचे प्रमुख प्रचारक होते!