पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) पटियालमधील राजपुरा येथील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधला.
“मी खोटी आश्वासने देणार नाही. जर कोणाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर त्यांनी पंतप्रधान मोदी, सुखबीर सिंग बादल आणि अरविंद केजरीवाल यांची भाषणे ऐकली पाहिजेत. मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे.” असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तसेच,“ माझ्याबद्दल दोन गोष्टी समजून घ्या, जेव्हा मी बोलतो तेव्हा विचारपूर्वकच बोलतो मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो मी या व्यासपीठावरून खोटी आश्वासनं देणार नाही. पंजाबाला धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर सगळ्यांनी एकजुटीने चालायला हवे.”, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर, “ राहुल गांधी हे देखील म्हणाले की, २०१४ पूर्वी पंतप्रधान प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येणार असल्याचे बोलायचे. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र आता ते नोकऱ्या किंवा भ्रष्टाचारावर बोलतच नाहीत. आता भाजपा फक्त ड्रग्जवर बोलत आहे.”
पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये सत्तेचा सारीपाट रंगणार आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.